बीडमध्ये विलास घुले प्रकरणावरून राजकारण; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं मात्र मौन

नुकताच केज तालुक्यातील टाकळी परिसरात विलास घुले या तरुणाचा खून करण्यात आला.

Sunetra Pawar On Beed

बीडमध्ये विलास घुले प्रकरणावरून राजकारण; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं मात्र मौन

बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा (Beed) प्रश्न निर्माण होऊ लागल्याने तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु त्यांच्या पश्चात बीडचे पालकमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुनेत्राताईंनी मात्र जिल्ह्यातील प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गंभीर बाब म्हणजे विलास घुले खून प्रकरणात तीन दिवस आंदोलन सुरु होते, याची साधी दखलही पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतल्याचे समोर आलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

थेट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोन करून माहिती घेतली, इतर नेत्यांनीही दखल घेतली, परंतु पवार यांना ही माहिती नव्हती की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यामध्ये बदल घडवण्यासाठी स्वतः अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारले होते. त्यांनी बीडमध्ये प्रशासकीय बदल करत त्याची सुरुवातही केली होती. परंतु दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्राताई पवार यांच्याकडे आली.

खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राला अटक?, विलास घुलेंनी मृत्यूआधी सगळं सांगितलं, बीडमध्ये काय घडतय?

सुनेत्राताई पवार बारामतीसह पक्षीय राजकारणात सक्रिय असल्याचं दिसत असताना बीडकडे मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून पवार या एक मे रोजी काही वेळासाठी बीडमध्ये आल्या होत्या, त्यानंतरपासून बीडमध्ये पाऊस पडला का, बीडमधील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या का, बीडमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती काय आहे, बीडमधील कायद व सुव्यवस्थेचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत का, याबाबतचा आढावा घेतल्याचे एकदाही समोर आलेले नाही. अर्थात प्रशासकीय पातळीवर त्या आढावा घेत असतीलही, परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत मात्र पोहचत नाही एव्हढे मात्र खरे.

शनिवारी केज तालुक्यातील टाकळी परिसरात विलास घुले या तरुणाचा खून करण्यात आला. यानंतर रविवार, सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्रीपर्यंत रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केले जात होते. या प्रकरणात खासदार णे यांचा मुलगा सौरभसोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलक करत होते. तीन दिवसांच्या आंदोलानंतर पोलिसांनी पुरवणी जवाब नोंदवून घेत आंदोलकांची समजूत घातली व मंगळवारी रात्री उशिरा विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केज पोलिस ठाण्यात आंदोलन सुरू असताना लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत माहिती घेतली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने पावले उचलत जवाब नोंदवला. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रश्नावर आवाज उठवला

याबरोबरच आमदार सुरेश धस, आमदार संदिप क्षीरसागर यांनी देखील घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत तपासाची मागणी केली. ज्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावरच या प्रकरणात आरोप होत आहेत, त्यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत हवे तर आमची चौकशी करा व या प्रकरणातील सत्य समोर येऊ द्या असा रोखठोक पावित्रा घेतला. परंतु पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची साधी प्रतिक्रिया देखील समोर न आल्याने त्यांना बीड जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या या परिस्थितीवर भाष्यच करायचं नाही किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहचवली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी विलास घुले प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Exit mobile version