Download App

हिंमत असेल औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण काढा; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा

Imtiaz Jaleel On Devendra Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारकडून (Central Govt)संरक्षण देण्यात आले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर‌ तो त्याचा संरक्षण दर्जा काढा, जर तिथं जायचं नाही तर त्याला संरक्षण दिले कशाला? असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केला आहे. त्याचवेळी खासदार जलील म्हणाले की, आमच्या सभेत कोणीतरी औरंगजेबाच्या नावाच्या घोषणा दिल्या ते चुकीचंच होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी मला सांगितलं होतं की, असा कोणताही प्रकार घडला नाही पण गृहमंत्र्यांचा दबाव असल्याचे सांगितले. त्याचवेळी वंचितचे अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केलेल्या वक्तव्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. (imtiaz-jaleel-criticize-on-devendra-fadnavis-prakash-ambedkar-aurangzeb-tomb)

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं नव्या वादाला तोंड; ठाकरे गटाची घणाघाती टीका

खासदार जलील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यानंतर ते म्हणाले की, हिंदू मुस्लिम दंगे थांबवायचे होते आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर ते थांबवण्यात यश आल्याचं आंबेडकरांनी म्हटलं होतं त्यावर खासदार जलील म्हणाले की, आमच्या सभेत कोणीतरी औरंगजेबाच्या घोषणा दिल्या ते चुकीचच होतं पण प्रकाश आंबेडकर ज्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर जातात त्यावर कोणी काही बोलत नाही, ते काय आपले बाप आहेत का? असा थेट सवाल यावेळी जलील यांनी केला.

एसटी बॅंकेवर झेंडा फडकावताच सदावर्तेंकडून नथुराम गोडसेंच्या समर्थनात घोषणा…

कोणीतरी औरंगजेबाच्या नावाचा नारा दिला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा मग प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर गेल्याचा प्रश्न विचारल्यावर म्हणायचं की, त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. आमचंही तेच म्हणणं आहे की, कोणाला कुठे जायचं कुठे नाही जायचं हा त्याचा त्याचा अधिकार आहे, असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार निशाणा साधला आहे.

खासदार जलील म्हणाले की, आपण फक्त संशयावरुन लोकांना मारणार आहेत, हे आपल्याला चालते का? पण त्यांच्याबद्दल काही गुन्हा दाखल नाही, कारवाई नाही, कोणी त्याबद्दल बोलत नाही. त्याच मुद्द्यावरुन जलील यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींमध्ये सांगायला ती हिंमत असायला पाहिजे होती की, हो आमच्या देशामध्ये या गोष्टी चुकीच्या घडत आहेत. त्या आम्ही दुरुस्त करणार आहोत. पण तसं झालं नाही.

त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दाव्यावर खासदार जलील यांना प्रश्न विचारण्यात आला की, त्यावर ते म्हणाले की, औरगजेबाच्या कबरीला संरक्षण कोणी दिलं आहे, हाच प्रश्न असेल तर ते संरक्षण केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे. मग तुम्ही तो औरंगजेबाच्या कबरीला संरक्षणाचा दर्जा काढा असंही ते म्हणाले. तुम्ही त्याला संरक्षण देणार आणि म्हणणार की तिथं जायचंच नाही, मग कशाला त्याला संरक्षण देता? असा सवालही यावेळी त्यांनी केला.

तुमच्यात हिंमत असेल तर ते संरक्षण काढा, तुम्ही हे करणार नाही आणि कोणी गेलं तर त्याला शिव्या द्यायच्या अशा प्रकारच्या भाषेचा वापर करायचा. तसेच त्या ठिकाणी इम्तियाज जलील गेला तर तणाव वाढतो आणि प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी गेले तर तणाव कमी होतो का? असाही सवाल जलील यांनी यावेळी केला. हे सर्व राजकीय स्वार्थासाठी सुरु आहे. त्यामुळे आमचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की, प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन दाखवा.

Tags

follow us