Download App

Wadhawan Brothers : तुरुंगातील पंचतारांकित अय्याशी भोवली; वाधवान बंधूंची ताटातूट

मुंबई : सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेले डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान यांची ताटातूट झाली आहे. पंचतारांकित अय्याशीचे स्टिंग ऑपरेशन व्हायरल होताच कपिल वाधवान यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यास अधिकाऱ्यांना परवानगी दिली. (Kapil Wadhawan sent to Nashik Jail after sting operation went viral)

वाधवन बंधूंच्या गैरवर्तनामुळे शिस्तीवर परिणाम होत आहे असं मत नोंदवत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी हे आदेश दिले.  यापूर्वी कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यावर मेहेरबान झालेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. जेल एस्कॉर्ट टीममधील एका अधिकाऱ्यासह तळोजा तुरुंगातील सहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. वाधवान बंधूंना वैद्यकीय तपासणीसाठी तुरुंगाबाहेर नेण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यांवर होती.

नेमके काय आहे प्रकरण?

बँक घोटाळ्याप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान हे तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर 34,615 कोटी युनियन बँक घोटाळा, येस बँक लाचखोरी प्रकरण, यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा, 14 कोटी PMAY घोटाळा असे चार सीबीआयचे गुन्हे दाखल आहेत. तर, इक्बाल मिर्ची मनी लाँडरिंग प्रकरण, यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा, येस बँक मनी लाँडरिंग, 34,615 कोटी युनियन बँक घोटाळा असे चार ईडीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय लॉकडॉऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांचाही गुन्हा दाखल आहे.

Wadhawan बंधूंवर मेहेरबान झालेल्या पोलिसांना दणका : एका अधिकाऱ्यासह 7 जणांवर मोठी कारवाई

मात्र यानंतरही मेडिकलच्या नावाखाली ते तळोजा कारागृहातून बाहेर येऊन सुख-सोयींचा उपभोग घेत असल्याचे समोर आले होते. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने यासंबंधित स्टिंग ऑपरेशन केले होते.

वाधवान बंधू मेडिकल टेस्ट आणि ट्रिटमेंटच्या नावाखाली नियमितपणे कारागृहातून बाहेर येत असायचे. त्यानंतर त्यांना पोलीस केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालय याठिकाणी घेऊन जात होते. इथे पार्किंग लॉटमध्ये अलिशान गाड्यांमध्ये त्यांचे कुटुंबीय, मित्र, निकटवर्तीय त्यांची वाट बघत असायचे. वाधवान बंधू आले की ते रुग्णालयात न जाता थेट पार्किंग लॉटमध्ये येत आणि दिवसभर सर्वसामान्य माणासासारखे आयुष्य जगत. सकाळी रुग्णालयाच्या आवारात दाखल झालेले वाधवान बंधू दिवसभर इथेच असायचे.

या दरम्यानच्या काळात त्यांना गाडीत नाष्टा, जेवण दिले जायचे. मोबाईल, लॅपटॉप देण्यात येतो. कुटुंबीय आणि बाकीच्यांशी ते कौटुंबिक विषयापासून ते उद्योगासंबंधित सर्व विषयांवर चर्चा करायचे. आज तकच्या दाव्यानुसार, मागील वेळी सात ऑगस्टला कपिल वाधवान यांना केईएम हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आणले होते. तर नऊ ऑगस्टला धीरज वाधवान यांना जेजे रुग्णालयात आणले होते. मात्र दोन्ही बंधूंना जेव्हापासून तळोजामध्ये ठेवले आहे, तेव्हापासूनच अशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात होती, असा दावा केला जात आहे.

Wadhawan brothers : कैदेतही जगतायत अलिशान आयुष्य; IPS अमिताभ गुप्ता कनेक्शन पुन्हा समोर

पुन्हा अमिताभ गुप्ता कनेक्शन समोर :

वाधवान बंधू यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आले होते. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी त्यांच्या जवळपास अर्धा डझन गाड्यांना थेट गृह मंत्रालयातून पत्र देण्यात आले होते. गृह मंत्रालयाचे तत्कालिन प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या सहीने त्यांना हे पत्र देण्यात आले होते. त्यावेळी गुप्ता यांना असा प्रकार पुन्हा न करण्याबाबत समज देण्यात आली होती. योगायोगाने आताही अमिताभ गुप्ता हेच महाराष्ट्र कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांच्याच काळात या दोन्ही गोष्टी घडून आल्या आहेत.

Tags

follow us