Wadhawan brothers : कैदेतही जगतायत अलिशान आयुष्य; IPS अमिताभ गुप्ता कनेक्शन पुन्हा समोर
Wadhawan brothers : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhwan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhwan) सध्या तळोजा कारागृहात आहेत. मात्र याच कारागृहात त्यांना अलिशान सोयी-सुविधा मिळत असल्याचे समोर आले आहे. मेडिकल टेस्ट आणि ट्रिटमेंटच्या नावाखाली हे दोघेही कारागृहातून बाहेर येतात आणि केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालयांच्या पार्किंग लॉटमध्ये सर्व सुखसोयी उपभोगत असल्याचे दिसून येत आहे. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने यासंबंधित स्टिंग ऑपरेशन केले आहे. (DHFL directors Kapil Wadhawan and Dheeraj Wadhawan, accused in the biggest bank scam case, are getting VIP treatment in jail.)
बँक घोटाळ्याप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान हे तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर 34,615 कोटी युनियन बँक घोटाळा, येस बँक लाचखोरी प्रकरण, यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा, 14 कोटी PMAY घोटाळा असे चार सीबीआयचे गुन्हे दाखल आहेत. तर, इक्बाल मिर्ची मनी लाँडरिंग प्रकरण, यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा, येस बँक मनी लाँडरिंग, 34,615 कोटी युनियन बँक घोटाळा असे चार ईडीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय लॉकडॉऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांचाही गुन्हा दाखल आहे. मात्र यानंतरही ते तळोजा कारागृहातून मेडिकलच्या नावाखाली बाहेर येऊन सुख-सोयींचा उपभोग घेत असल्याचे समोर येत आहे.
नेमकं काय घडतंय?
वाधवान बंधू मेडिकल टेस्ट आणि ट्रिटमेंटच्या नावाखाली नियमितपणे कारागृहातून बाहेर येतात. त्यानंतर त्यांना पोलीस केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालय याठिकाणी घेऊन जातात. इथे पार्किंग लॉटमध्ये अलिशान गाड्यांमध्ये त्यांचे कुटुंबीय, मित्र, निकटवर्तीय त्यांची वाट बघत असतात. वाधवान बंधू आले की ते रुग्णालयात न जाता थेट पार्किंग लॉटमध्ये येतात आणि दिवसभर सर्वसामान्य माणासासारखे आयुष्य जगतात. सकाळी रुग्णालयाच्या आवारात दाखल झालेले वाधवान बंधू दिवसभर इथेच असतात.
या दरम्यानच्या काळात त्यांना गाडीत नाष्टा, जेवण दिले जाते. मोबाईल, लॅपटॉप देण्यात येतो. कुटुंबीय आणि बाकीच्यांशी ते कौटुंबिक विषयापासून ते उद्योगासंबंधित सर्व विषयांवर चर्चा करतात. आज तकच्या दाव्यानुसार, मागील वेळी 9 ऑगस्टला कपिल वाधवान यांना केईएम हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आणले होते.तर 9 ऑगस्टला धीरज वाधवान यांना जेजे रुग्णालयात आणले होते. मात्र दोन्ही बंधूंना जेव्हापासून तळोजामध्ये ठेवले आहे, तेव्हापासूनच अशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा दावा केला जात आहे.
पुन्हा अमिताभ गुप्ता कनेक्शन समोर :
वाधवान बंधू यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आले होते. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी त्यांच्या जवळपास अर्धा डझन गाड्यांना थेट गृह मंत्रालयातून पत्र देण्यात आले होते. गृह मंत्रालयाचे तत्कालिन प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या सहीने त्यांना हे पत्र देण्यात आले होते. त्यावेळी गुप्ता यांना असा प्रकार पुन्हा न करण्याबाबत समज देण्यात आली होती. योगायोगाने आताही अमिताभ गुप्ता हेच महाराष्ट्र कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांच्याच काळात या दोन्ही गोष्टी घडून आल्या आहेत.
सखोल चौकशी करणार : देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
दरम्यान, या सर्व प्रकारावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे. तसंच यामध्ये जे कोणी दोषी आढळलतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. तर पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी प्रथमदर्शनी जे दिसतंय ते योग्य आहे. त्यामुळे सर्वांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.