Download App

Irshalwadi : रस्ताच नाही! जेसीबी, पोकलेन नेता येत नसल्याने हाताने ढिगारे उपसण्याची वेळ

रायगड : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याच्या घटनेत आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे 250 लोकं राहत असल्याची माहिती आहे. यातील अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं जात आहे. दरम्यान, गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गिरीश महाजन यांनी सांगितले, की या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. जी पायवाट आहे ती पावसामुळे पूर्ण चिखलात गेली आहे. बचाव पथकांनाही पायीच जावे लागत आहे. जेसीबी, पोकलेनही घटनास्थळी नेणे शक्य होत नाही. त्यामुळे बचावपथकाचे कर्मचारी हातानेच ढिगारे उपसत आहेत. तर जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री, पालकमंत्री घटनास्थळी दाखल

या गावात जवळपास 40 घरे आहेत. ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला, मदतकार्य करणाऱ्या पथकांना महत्वाच्या सूचना दिल्या. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरसालवाडी या गावात 40 ते 50 घरे आहेत. जवळपास तीस ते चाळीस लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडविणारा प्रसंग :

महिला म्हणाली, ‘बुधवारी रात्री मोठा पाऊस सुरू होता. वाराही सुटला होता. आम्ही घरातच होतो. अचानक बाहेर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादं घरच पडलं आहे. पण, बाहेर येऊन पाहिलं तर अख्खं गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. आमच्या शेजारील काही घरेही दबली गेली होती. त्यानंतर आम्ही आरडाओरडा करू लागलो. घरातील सदस्यांना घेऊन पटकन बाहेर पडलो.’

Tags

follow us