Nilesh Rane Vs Chhagan Bhujbal : महायुतीत सध्या चांगल्याच घडामोडी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा दोन दिवसांवर आलाय आणि विधानसभा तोंडावर असताना नेत्यांच्या कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक्स (ट्विट)वर पोस्ट करत (Chhagan Bhujbal) छगन भुजबळांचा चांगलाच समाचार घेतलाय. भुजबळ यांनी नुकतंच विधानसभेच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांचा संदर्भ देत राणे यांनी भुजबळांना एकप्रकारे सुनावलंच आहे.
अब की बार 400 पार घोषणेमुळे दमछाक झाली; पंतप्रधानांचा दाखला देत भुजबळ थेटच बोलले
काय म्हणालेत निलेश राणे ?
मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं?
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असतानाही आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी-नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात, ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनही नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे. अशा शब्दांत राणे यांनी भुजबळांना एकप्रकारे सुनावलं आहे.
काय म्हणाले होते भुजबळ?
राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये लोकसभेला मोठी खटापट झाली. मात्र,विधानसभेला योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत. विधानसभेमध्ये 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत. भाजपसोबत आलो त्यावेळी त्यांनी 80-90 जागा देणार असं सांगितलं होतं. आता झाली तशी खटपट होता कामा नये, आमचा वाटा आम्हाला मिळायलाच पाहिजे असं भुजबळ म्हणाले आहेत. भुजबळांच्या मागणीवर अजित पवारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Video : विधानसभेतही खटपट होणारच; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांनी दिलं उत्तर
काय होणार ?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसला. पण निवडणुकीच्या निकालापूर्वीच नेत्यांमध्ये वादाच्या ठिगण्या पडत आहेत. महायुतीत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातून पदवीधरसाठी उमेदवार दिला, भुजबळ जागांबाबत दावा करत आहेत. त्यामुळे विधानसभेत नेमकं काय होणार? तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार की, ‘एकटा चलो’चा निर्णय घेणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.