Download App

जयंत पाटलांना लवकरच धक्का! ‘शेकाप’ नेत्याला भाजपाचे वेध; पडद्यामागं काय घडतंय?

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Aswad Patil : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. महायुतीला घवघवीत यश मिळालं. यानंतर आता महाविकास आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांना गळती लागली आहे. आताही राज्याच्या राजकारणात चर्चा घडवून आणणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. आस्वाद पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले होते.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे अॅड. आस्वाद पाटील भाचे आहेत. आस्वाद पाटील यांनी आपल्या समर्थकांशी चर्चा करण्यासाठी 10 डिसेंबर 2024 रोजी अलिबाग शहरातील रवीकिरण हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली होती. याच बैठकीत त्यांनी पक्षातून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी शेकापच्या जिल्हा चिटणीस आणि सदस्य पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटील कुटुंबातील वाद समोर आले होते. पंढरपूर येथे झालेल्या अधिवेशनात या वादाची ठिणगी पडली होती.

शेकापला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; आस्‍वाद पाटील यांचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आस्वाद पाटील, माजी आमदार सुभाष पाटील प्रचारापासून लांब राहिले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटी यांचा शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी तब्बल 30 हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर वाद अधिकच वाढत राहिले. यानंतर पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आता राजीनामा दिल्यानंतर आस्वाद पाटील लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील अशा चर्चा राजकारणात सुरू झाल्या आहेत.

लवकरच भाजप प्रवेश ?

कोकण पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणूकीपासून आस्‍वाद पाटील हे भाजप नेत्‍यांच्‍या संपर्कात होते. विधानसभा निवडणूकीत ते अलिप्‍त राहिले. त्‍याचा मोठा फटका चित्रलेखा पाटील यांना बसला. आपण कुठल्‍या पक्षात जाणार यावर आस्‍वाद पाटील बोलायला तयार नाहीत. मात्र, भाजप नेत्‍यांशी झालेल्‍या अंतिम बोलणीनुसार ते लवकरच भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचं त्‍यांच्‍या निकटवर्तीयांनी सांगितलं. आता अलिबाग तालुक्यात येत्या काही दिवसांत भाजपा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात आस्वाद पाटील भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे.

दीपक साळुंखे ‘मशाली’वर सांगोला विधानसभा लढणार? शेकाप बंडखोरीच्या तयारीत..

follow us