Download App

Lok Sabha 2024 : संभाजीराजे छत्रपतींनी फुंकलं रणशिंग; आघाडीचा सस्पेन्स कायम ठेवत जागांची घोषणा

पंढरपूर : कोणत्या आघाडीत जायचे याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. निवडणुकीच्या वेळी जशी परिस्थिती असेल ते पाहून निर्णय घेतला जाईल. मात्र आम्ही सर्व 48 जागा लढविण्यासाठीच्या दृष्टीने तयारी करत आहोत. सध्या राज्यभर दौरे काढून, महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. पक्षबांधणीची एकच लाईन ठरवून ताकद वाढविण्यार भर दिला जात आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्वराज्य पक्षाची काय रणनिती असणार याबाबत खुलासा केला. ते पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Sambhajiraje Chhatrapati disclosed about the strategy of the Swarajya Party in view of the upcoming Lok Sabha elections)

संभाजीराजे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविणार?

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती माढ्यातून निवडणूक लढविणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी मागील महिन्यातच संभाजीराजे छत्रपती यांचा सांगोल्यामध्ये भव्य मेळावा झाला होता. त्यानंतर आज पंढरपूर दौऱ्यावर ते आले होते. या चर्चांबाबतही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. यावर त्यांनी महाराष्ट्रातील 48 जागांवर स्वराज्य पक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.

संभाजीराजे कोल्हापूर सोडणार?

आगामी लोकसभा निवडणूक संभाजीराजे छत्रपती कुठून लढविणार? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. मात्र कोल्हापूर मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. कोल्हापूर ऐवजी त्यांनी राज्यातील अन्य 4 मतदारसंघामधून आग्रह आहे, त्यामुळे त्याबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

मला नाशिक, नांदेड, धाराशिव आणि परभणीच्या लोकांनी निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला आहे. त्यामुळे मी स्वतः निवडणूक कुठून लढायची, लोकसभा लढवायची की नाही, मुळात निवडणूक लढवायची की नाही याबाबत संभ्रमात आहे. मला दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही आवडतो. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा दोन्ही निवडणुका लढवू शकतो. पण मी खासदार आमदार नसलो तरी चालेल, सत्तेसाठी सगळं करत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us