Maharashtra Assembly Election 2024 : आज दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आणि (Moral code of conduct) तारखा जाहीर करणार आहे. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल.
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालू केली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठी लढत होणार आहे. तर, पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांनीही निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे.
मोठी बातमी! आज महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीची घोषणा; दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आचारसंहिता कधी?
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात.
आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम
सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे.
कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.
कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानही घेणं आवश्यक आहे. विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही.
मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते.
मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत. प्रचारसाहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये. मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार ‘भ्रष्ट आचरण’ आणि अपराध/गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी करता कामा नये.
मतदारांना पैसे देणं, मतदारांना धमकी देऊन घाबरवणं, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं, प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या-येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे.