Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. मंत्र्यांची वक्तव्ये आणि सरकारच्या हालचाली यांवरून तशी शक्यता वाटत होती. पण, आता मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची काळजी वाढविणारी बातमी आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 जुलैपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाआधी विस्तार होईल असे सांगण्यात येत आहे. याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जून महिन्यात होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. आजपासून तीन आठवडे वाट पहावी लागणार आहे. हा विस्तार रखडण्यामागचे कारणही समोर आले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांवर एक जबाबदारी निश्चित केली आहे. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात काम करायचे आहे. त्यामुळे सर्व मंत्री त्याठिकाणी असणार आहेत. तसेच समतोल साधण्याच्या उद्देशानेही सरकारकडून अभ्यास सुरू आहे. त्यानुसार काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. याआधारावरच राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केंद्रातला आणि राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे गटातील तीन मंत्र्यांना केंद्रात मंत्रिपदे मिळू शकतात अशी शक्यता आहे. यामध्ये दोन राज्यमंत्री तर एक कॅबिनेट मंत्रिपदाचा समावेश असेल. त्यासाठी चर्चाही सुरू झाल्याची माहिती आहे.
अमित शाहंनी आम्हाला शब्द दिला आहे… ; भाजपच्या तिकिटावर लढण्याच्या चर्चांवर मंडिकांचे उत्तर
महिलांना संधी मिळणार का ?
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे राज्य सरकार नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहे. आता न्यायालयाचा निकाल आला आहे. तशा मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्र्यांना कामकाजाचे वाटप केले जाणार आहे. आता या विस्तारात कुणाला मंत्रीपदावर संधी मिळणार, कुणाला कोणती खाती मिळणार, कुणाचे खाते काढून कुणाला दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.