Download App

सरकारी निर्णयांचा पाऊस! आचारसंहितेपूर्वी फक्त १० दिवसांत तब्बल १२९१ शासन निर्णय..

निवडणुकीआधी महायुती सरकारने फक्त दहा दिवसांच्या काळात तब्बल 1 हजार 291 निर्णय घेतले आहेत.

Maharashtra Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच (Maharashtra Elections) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील महायुती सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शासन निर्णयांचा धडाकाच लावण्यात आला आहे. शासन निर्णयांचा पाऊस पडू लागला आहे. फक्त दहाच दिवसांत तब्बल 1 हजार 291 निर्णय घेण्यात आले आहेत. विविध योजना आणि विकासकामांची घोषणा करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांचा हा मूव्ह विरोधी पक्षांना मात्र अस्वस्थ करू लागला आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना फक्त टक्केवारीचं हित साधण्यासाठी सरकारकडून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे. त्यांच्याकडून आरोप होत असले तरी सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेण्यात मात्र हात आखडता घेतलेला नाही.

राजकारणातील मोठी बातमी! अजित पवार बारामती सोडणार; शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

राज्यात अद्याप निवडणुकीची घोषणा झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला होता. यानंतर या दौऱ्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. या घडामोडींनंतर राज्यात लवकरच निवडणुकांची घोषणा होईल असे सांगण्यात येत आहे.

निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता पाहता राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. मागील दहा दिवसांत तब्बल 1291 निर्णय घेण्यात आले. तसेच मागील महिन्यात सरकारने जवळपास 132 निर्णय घेण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीआधी प्रलंबित राहिलेले सर्व निर्णय राज्य सरकारने घेऊन टाकले आहेत. राज्य सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय घेतल्याने या निर्णयांची अंमलबजावणीसाठी निधीची अडचण अर्थ विभागासमोर उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थ खात्याचा विरोध असतानाही मंत्री अगदी शेवटच्या वेळी निर्णय जाहीर करत असल्याने अर्थमंत्री अजित पवार यांची नाराजी वाढत चालल्याचेही बोलले जात आहे.

अजित पवार ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार, ही बारामतीकरांची इच्छा.., प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, आचारसंहिता जाहीर होण्याआधी 1 ऑक्टोबर रोजी सरकारने 148 निर्णय जारी केले. 3 ऑक्टोबरला 203 निर्णय, 4 ऑक्टोबरला 188 निर्णय, 5 ऑक्टोबरला 2 निर्णय, 7 ऑक्टोबरला 209 निर्णय, 8 ऑक्टोबरला 150 निर्णय, 9 ऑक्टोबर रोजी 197 निर्णय तर काल 10 ऑक्टोबर रोज तब्बल 194 शासन निर्णय जारी करण्यात आले. तसेच मागील सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर 23 सप्टेंबर या दिवशी 24 निर्णय घेण्यात आले होते. 30 सप्टेंबर रोजी 38 निर्णय, 4 सप्टेंबरला 32 तर 10 सप्टेंबर रोजी 38 निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले होते.

follow us