Bacchu Kadu : “वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण..”, बच्चू कडू सरकारवर का संतापले?
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे.

Bacchu Kadu Warns Maharashtra Government : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाला विरोध सातत्याने वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. आता या विरोधाचे स्वर राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकायला येत आहेत. माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी या मुद्द्यावर राज्य सरकारला रोखठोक इशारा दिला आहे. वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे. शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेच्या निमित्ताने वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे कडू आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती (Bacchu Kadu) टीका केली. पवनार ते पत्रादेवी या सुमारे 802 किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणीही केली नव्हती. शेतकऱ्यांचीही मागणी नव्हती. तरीदेखील हा महामार्ग मंजूर करण्यात आला. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. या महामार्गाला आमचा विरोध आहे. सरकारने महामार्गाचे काम सुरू करू नये. जर काम सुरू केले तर काम बंद करून वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची आमची तयारी आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
“देवेंद्रजी, तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं”, बच्चू कडूंचा घणाघात
तत्काळ कर्जमाफी जाहीर करा
राज्यातील शेतकऱ्यांना काहीही कमी पडणार नाही असे सरकार सांगते. पण खरंतर नुकसानीचे पंचनामेच केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मग मदत तरी कशी मिळणार. पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी. कर्जमाफी देखील जाहीर करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली. सरकारकडून शेतमालासाठी हमीभाव जाहीर केला जातो पण दुसरीकडे 3400 रुपयांनी सोयाबीन विक्री करावी लागत असेल तर त्या हमीभावाचा अर्थ काय असा सवाल माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. परंतु, शेजारच्या छत्तीसगड सारख्या राज्यात शेतमालाला 3100 रुपये क्विंटल हमीभाव मिळतो. यापेक्षा कमी दर आपल्या राज्यात मिळतो. छत्तीसगडमध्ये एक एकरात 12 ते 13 हजार रुपये दर देतो. महाराष्ट्रात मात्र हेक्टरमागे 15 हजार रुपये देतो एवढी मोठी तफावत आहे. मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. तरीदेखील इथला कापूस, तूर, भात उत्पादक शेतकरी मरतोय. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे ह्यांची सत्ता आहे. मग देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं हे त्यांनी सांगावं असे बच्चू कडू काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
मराठवाड्यात या शेतकरी म्हणून संबोधित करा; बच्चू कडूंकडून राज ठाकरेंना शेतकरी यात्रेचं निमंत्रण