Download App

“मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य टाळावे”; आमदार बच्चू कडूंनी दिला सल्ला

Bacchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) उपमु्ख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या वक्तव्यांवर नाराजीचा सूर उमटला. आताही आमदार बच्चू कडू यांनी (Bacchu Kadu) त्यांना एक सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली ती आक्षेपार्ह आहे. त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यांनी आरक्षणाव्यतिरिक्त राजकीय भाष्य करू नये. समाजाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. आता त्यांनी राजकीय वादात पडू नये. हेच समाजासाठी फायदेशीर ठरेल. मूळ गोष्टी सोडून अन्य विषयांवर बोलू नये, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांना दिला.

Manoj Jarange : ‘चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो’ SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

कडू पुढे म्हणाले, याआधी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सरकारला जड जात होतं. पण आता सरकार त्यांच्यावर भारी पडताना दिसत आहे. जरांगेंच्या मागे बोलता धनी कोण आहे, जाळपोळ आणि दगडफेक कुणी केली याचा शोध घेण्यास काहीच हरकत नाही. पण 75 वर्षे मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही त्यामुळे हा समाज मागे पडला. सगेसोयऱ्यांच्या बाबतीतील संभ्रम दूर झाला पाहिजे, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी उडाली होती. गोंधळ जास्त वाढत असल्याचे पाहून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं चिघळलं? आंदोलनात दगड आणि जेसीबी कुठून आले? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? असा सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनीही सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

follow us