मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश
Maharashtra Assembly Session : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी उडाली. गोंधळ जास्त वाढत असल्याचे पाहून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं चिघळलं? आंदोलनात दगड आणि जेसीबी कुठून आले? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? असा सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनीही सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.
शेलार पुढे म्हणाले, मनोज जरांगे कुठे राहतात. त्यांना कारखान्यातून जेसीबी आणि दगड मिळाले असा सवाल करत संपूर्ण नियोजन एका कारखान्यातून आणि घरातून सुरू होते, असा गंभीर आरोप शेलार यांनी केली. आंदोलनात दगड आणि जेसीबी कोणत्या कारखान्यातून आणले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा. आमच्या जीवाला धोका आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा काल जरांगेंनी केली. कटकारस्थानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही शेलार म्हणाले.
लाठीचार्ज झाल्यानंतर वातावरण दुषित : वडेट्टीवार
जर काही चुकीचं बोललं गेलं त्याचं मी समर्थन करणार नाही. पण अचानक काय झालं आम्हालाही कळायला मार्ग नाही, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. आज जी परिस्थिती निर्माण झाली याच्या खोलात गेलं पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा आम्ही एकमताने मान्य केलं. महाराष्ट्र बेचिराख करू असे कुणी म्हणत असेल तर त्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करू. पण, शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाला. तिथून खरंतर वातावरण दुषित झालं. आताचे उपमुख्यमंत्री पाच वर्षे मुख्यमंत्री होते. गृहखातं तुमच्याकडे आहे. करा चौकशी. परंतु, ज्या व्यक्तीने त्यांना डिवचण्याचं काम केल. त्यामुळे त्यांचा उद्रेक झाला. जरांगे काही राजकारणी नाहीत त्यांना आपण राजकारणी केलं, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
जरांगेंवर आरोप करणाऱ्यांचीही चौकशी करा
जरांगे पाटील यांनी जे बोललं, ते उद्रेकातून बोलले आहेत. जर त्यांच्यावर आरोप होत असतील तर ते बोलणार. पण काही शक्ती त्यांच्यामागे असेल असे तुम्ही म्हणत असाल तर चौकशी करा. आमचंही समर्थन आहे. पण हे जे आंदोलन पेटलंय त्याच्यामागे कोण याचीही चौकशी करा. जे जरांगे पाटलांवर आरोप करताहेत ती कुणाची माणसं आहेत याचीही चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल