Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी (Maharashtra Assembly Elections 2024) केल्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर मविआने लक्ष (Devendra Fadnavis) केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीतही महायुतीला झटका देण्याचं प्लॅनिंग महाविकास आघाडीनं सुरू केलं आहे. कोणताही वाद होऊ न देता एकत्रित लढण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. लोकसभेतील चुका शोधून या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी विधानसभा निवडणुकीत घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पराभूत उमेदवारांना दिल्या.
देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या लोकसभेतील पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. इतका मोठा पराभव कसा झाला, नेमकं चुकलं तरी कुठं, कुणी मदत केली, कुणी केली नाही, बूथनिहाय किती मतदान झालं, कुठे मते कमी पडली, कोणत्या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक फटका बसला, कुणी अन्य पक्षांना आतून मदत केली यांसह अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पराभूत उमेदवारांनीही मनातील खदखद बोलून दाखवली.
महायुतीत काय शिजतंय? शिंदे, फडणवीस अन् अजितदादांची तब्बल दीड तास खलबतं
या उमेदवारांचे म्हणणे दोन्ही नेत्यांनी ऐकून घेतले. आता नव्या उमेदीने कामांची तयारी करा. विधानसभा निवडणुकीत झोकून देऊन काम करा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या आता होणार नाहीत याची काळजी घ्या अशा सूचना फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीनंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही पार पडला. या बैठकीनंतर भाजप कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे याचा अंदाज येत आहे. याच गोष्टींचा विचार करून विधानसभा निवडणुकीत रणनीती ठरवण्यात येईल आणि महाविकास आघाडीला व्याजासह परतफेड करण्याचे मनसूबे भाजपाचे आहेत.
दरम्यान, याआधी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली होती. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तार यांसह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. अधिवेशन काळात आता विरोधक जास्त आक्रमक होतील. त्यांचा आक्रमकपणा कसा रोखायचा याबाबत रणनीतीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या तिन्ही नेत्यांत याआधीही अशा अनेक बैठका झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही बैठक झाल्याने महत्वाची ठरली. विधानपरिषदेची निवडणूक आणि पुढील विधानसभेची निवडणूक यावरही तिन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी नरेटिव्ह पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण केली. ही भीती दूर करून त्यांना आश्वास्त करण्यात महायुतीचे नेते कमी पडले त्याचा फटका महायुतीला निवडणुकीत बसला. विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून असे आणखी काही नरेटिव्ह पसरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा या नरेटिव्हला कसे तोंड द्यायचे, यावरही चर्चा झाल्याची शक्यता सांगितली जात आहे.
‘इंडिया’चा हिट फॉर्म्युला ‘मविआ’ रिपीट करणार; विधानसभेत महायुतीच्या कोंडीचं खास प्लॅनिंग