महायुतीत काय शिजतंय? शिंदे, फडणवीस अन् अजितदादांची तब्बल दीड तास खलबतं

महायुतीत काय शिजतंय? शिंदे, फडणवीस अन् अजितदादांची तब्बल दीड तास खलबतं

Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही मतदार महायुतीकडे फारसा वळला नाही. भाजपला फक्त नऊ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच खासदार निवडून आणता आला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सात जागा जिंकल्या. अशा परिस्थितीत महायुतीने डॅमेज कंट्रोल सुरू केलेले असतानाच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. अशातच काल रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तार यांसह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

सरसकट घरवापसी नाहीच, ‘त्या’ नेत्यांना नो एन्ट्री; शरद पवारांनी सांगितल्या पक्षप्रवेशाच्या अटी

अधिवेशन काळात आता विरोधक जास्त आक्रमक होतील. त्यांचा आक्रमकपणा कसा रोखायचा याबाबत रणनीतीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या तिन्ही नेत्यांत याआधीही अशा अनेक बैठका झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही बैठक झाल्याने महत्वाची ठरली. विधानपरिषदेची निवडणूक आणि पुढील विधानसभेची निवडणूक यावरही तिन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी नरेटिव्ह पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण केली. ही भीती दूर करून त्यांना आश्वास्त करण्यात महायुतीचे नेते कमी पडले त्याचा  फटका महायुतीला निवडणुकीत बसला. विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून असे आणखी काही नरेटिव्ह पसरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा या नरेटिव्हला कसे तोंड द्यायचे, यावरही चर्चा झाल्याची शक्यता सांगितली जात आहे.

‘पिपाणी’ विरोधात शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, म्हणाले, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाणार 

लोकसभा निवडणुकीत भाजपाने सपाटून मार खाल्ला. मागील निवडणुकीत 23 जागा जिंकणारा भाजप फक्त 9 जागांवर थांबला. हा मोठा झटका महाराष्ट्रात बसला. भाजप नेत्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांना पक्ष नेतृत्वाने चांगलेच फटकारले होते. तसेच राज्यातील नेत्यांच्या कामगिरीवर आता दिल्लीतून लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काही संघटनात्मक बदलही करण्यात आले आहेत.

भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचे अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा या दोन्ही प्रभारींकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज