Download App

शिंदे, विखे-पाटील अन् आता अजितदादा… : फडणवीसांनी तिसरा विरोधी पक्षनेता फोडला

Maharashtra Political Crisis :  वर्षभरापूर्वीच्या एकनाथ शिंदेंच्या राजकीय भूकंपानंतर आज पुन्हा एकदा राज्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठा राजकीय भूकंप केला आहे. राष्ट्रवादीतील 40 आमदारांसह अजित पवार ‘देवेंद्रवासी’ झाले आहेत. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी 9 आमदारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  राज्यात घडणाऱ्या या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तीन विरोधीपक्ष नेते फोडले आहेत.

यात प्रामुख्याने एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यानंतर आता अजित पवार या तीन वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढले होते. त्यावेळी भाजपच्या 123 जागा निवडून आल्या होत्या. पण त्यावेळी सत्ता स्थापनेला त्यांना अडचण येत होती. तेव्हा शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे काही महिने विरोधी पक्षनेते राहिले होते. त्यानंतर शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली. यानंतर गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. सत्ता स्थापनेला दोन दिवसांपूर्वीच वर्ष पूर्ण झाले असताना राज्याच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप झाला आहे.

अजितदादा पर्मनंट DCM : पाचव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

यापूर्वी 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  एक मोठा धक्का काँग्रेस पक्षाला बसला होता. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी अहमदनगर दक्षिण या लोकसभेच्या जागेवरून विखे पाटील व शरद पवार यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत असल्याने त्यांनी काँग्रेससाठी ही जागा सोडण्यास नकार दिला. तेव्हा राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना अहमदनगर दक्षिणमधून काँग्रेसची उमेदवारी हवी होती, पण त्यावेळी राष्ट्रवादीसोबत बाद झाल्याने सुजय विखे यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. त्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे हे देखील भाजपवासी झाले.

अखेर अजित पवारांचा शरद पवारांना चकवा; दादांसह 40 आमदार ‘देवेंद्र’वासी

यानंतर आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार हे सुद्धा राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिवसेना व भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले.  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासह नऊ आमदार हे शपथबद्ध झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची सातत्याने चर्चा होती. त्यानंतर अखेर आज त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत तीन विरोधी पक्षनेत्यांना फोडले आहे. त्यात पहिला नंबर हा राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेता हा भावी मुख्यमंत्री म्हणून मानला जातो. अशा दिग्गज नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासोबत सत्तेत सामावून घेतले आहे.

 

Tags

follow us