Download App

भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपात गेले अन् तपासच थांबला; महाराष्ट्रातच सर्वाधिक नेते

Maharashtra Politics : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजपात प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी भाजपने त्यांना राज्यसभेचं (Rajya Sabha Election) तिकीट दिलं. राज्याच्या राजकारणातील ही ठळक घटना. तसं पाहिलं याच अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यात पंतप्रधान मोदींपासून सगळ्याच नेत्यांनी तुफान टीका केली. शहीदांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही अशी वक्तव्ये भाजप नेत्यांची होती. पण, आता सारं चित्रच पालटलं आहे. अशोक चव्हाण आता भाजपात आहेत. राज्यसभेचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या येण्यामुळे भाजपातही ‘फीलगुड’ वातावरण आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच अशोक चव्हाणांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अशोक चव्हाणांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपात प्रवेश केला असे फडणवीस म्हणाले होते. फक्त अशोक चव्हाणच नाहीत तर देशाच्या राजकारणावर नजर टाकली तर असे अनेक नेते आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांना भाजपने पक्षात घेऊन पदेही दिली आहेत.

नांदेड शहर कॉंग्रेस कमिटीची कार्यकारणी बरखास्त, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर

अशोक चव्हाणांची आदर्श घोटाळ्यात ईडी सीबीआय चौकशी करत आहे. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. या घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी यूपीए सरकराच्या घोटाळ्यांची श्वेतपत्रिका संसदेत सादर केली. त्यात त्यांनी या आदर्श घोटाळ्याचाही उल्लेख केला होता.

अजित पवार 

महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात आधी अजित पवारांचं नाव येतं. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप भाजपने केले होते. राज्यातील भाजप नेते आणि पंतप्रधान मोदीही त्यांच्यावर तुटून पडले होते. अजित पवार पाटबंधारे मंत्री असताना 1999 ते 2009 या काळात हा घोटाळा झाला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2018 मध्ये अजित पवारांना जबाबदार धरले होते. आता पिक्चर बदलला आहे. अजित पवार भाजपबरोबर सत्तेत आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही आहेत. ईडीने त्यांना कधीही चौकशीसाठी बोलावले नाही.

नारायण राणे

नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांची भाजपबरोबरील दुश्मनी सर्वश्रुत होती. 2016 मध्ये किरिट सोमय्यांनी ईडीच्या सहसंचालकांना पत्र लिहून राणेंच्यां कुटुंबियांच्या कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. नारायण राणे यांच्यावर अवघना ग्रुपचे मालक आणि बिल्डर कैलाश अग्रवाल यांच्यासह 300 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या चौकशीसाठी ईडीने राणेंना नोटीसही दिली होती. त्यानंतर राणेंनी 15 ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. ईडीने याआधीच म्हणजे 9 एप्रिल 2019 मध्ये अवघना ग्रुपविरुद्ध तपास बंद केला होता.

प्रविण दरेकर

2009 ते 2014 या काळात प्रविण दरेकर मनसेचे आमदार होते. पण, आता ते राज्यातील टॉप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. 2015 मध्ये मुंबई सहकारी बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप दरेकरांवर आहे. या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. दरेकरांनी 2016 मध्ये भाजपात प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. पुढे 2022 मध्ये दरेकरांना क्लीन चीट मिळाली.

केजरीवालांना ईडीचे सहावे समन्स, १९ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

बबनराव पाचपुते

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना बबनराव पाचपुते यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या ते भाजप आमदार आहेत. मोठा परतावा देण्याच्या नावाखाली पाचपुतेंनी राज्यात 26 पोंझी योजना चालवून 10 लाख लोकांना फसवल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. यांसह आणखी काही आरोपही त्यांच्यावर आहेत. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. यांसह शिंदे गटातील संजय राठोड, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ विजय कुमार गावित, यशवंत जाधव या महाराष्ट्रातील नेत्यांवर आरोप आहेत. पण त्यांच्यावर काहीच कारवाई झाल्याचे दिसत नाही.

महाराष्ट्रानंतर दुसरा नंबर पश्चिम बंगालचा आहे. बंगालमधील शुभेंदू अधिकारी, मुकुल रॉय, जितेंद्र तिवारी, सोवन चटर्जी यांच्यावरील आरोपांचा तपास आता थांबला आहे.

follow us