Nana Patole on Sanjay Raut : राज्यात सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यांनी जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावर वाद सुद्धा झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रांगल्याचेही दिसून आले. यानंतर आज संजय राऊत यांनी माघार घेत मी अजित पवार यांच्याबाबत काल जे काही बोललो ते बोलायला नको होते, मला खेद वाटतो असे म्हटले. या सगळ्या वादावर काँग्रेस नेते मात्र कमालीचे शांत होते. या घडामोडींवर काँग्रेसकडून फारशा प्रतिक्रिया आल्या नाहीत. यामागे नेमके काय कारण होते, याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या संदर्भात प्रश्न विचारला. त्यावर पटोले म्हणाले, आम्हाला संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. काँग्रेस पक्षाची तशी भूमिका आहे त्यामुळे मी संजय राऊत यांच्याबद्दल काहीही प्रतिक्रिया देणार नाही.
राऊतांना भुजबळांनी फटकारले; ‘अशानं वज्रमूठीवर लोकांचा विश्वास उरणार नाही’
महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पोटनिवडणुका होतील की नाही हा प्रश्न अजून अधांतरी आहे. पण काँग्रेस पक्षाने मागील दोन दिवसात राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आणि जो सर्वे करत आहे त्याचे अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार जी काही स्थिती आहे ती महाविकास आघाडीत ठेऊ, त्यानुसार चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे पटोले म्हणाले.
ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री
भंडारा शहरातील भावी मुख्यमंत्री बॅनरवरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. पटोले म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक राहू शकतात. अशा पद्धतीने लोकशाहीत होत नाही. ज्याचे आमदार जास्त असतील त्यांचाच मुख्यमंत्री होतो. काँग्रेस पक्षात हायकमांड याबाबत निर्णय घेतं. कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक असू शकतात पण असं त्यांनी करू नये हे मी त्यांना सांगितलं आहे. आता बारामतीत बोर्ड लागलेत. पूर्ण महाराष्ट्रातच लागलेत. नागपुरात लागलेत. कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालणे कठीण असते. पण मी तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की आधी आमदार सगळे निवडून आणा नंतर काँग्रेस हायकमांड त्यावर निर्णय घेईल.
‘ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री’; भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरबाजीवर पटोलेंचे तिरकस उत्तर