प्रफुल्ल साळुंके (विशेष प्रतिनिधी)
Mahadeo Jankar : ‘मला एनडीएच्या बैठकीला का बोलावले नाही हे त्यांना (भाजप) विचारण्याची मला काहीच गरज वाटत नाही. त्यांना जर आमची किंमत समजत नसेल तर त्यांच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही. आता भाजपानेच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचेच बोलायचे झाले तर आता मी माझ्या पक्षाची ताकद वाढविणार आहे. ज्यावेळी माझी ताकद वाढेल त्यावेळी ते निश्चित माझ्याबरोबर येतील. तोपर्यंत मी काही त्यांनी मस्का लावणार नाही. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मतदारसंघातून माझं तिकीट जवळपास फायनल झालं आहे, असा इशाराच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आ. महादेव जानकर यांनी भाजपला दिला.
Irshalwadi : अजितदादा, फडणवीसांच्या पावलावर ठाकरेंचे पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
लेट्सअप मराठीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत जानकर यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. पक्षाची आगामी वाटचाल कशी असेल यावरही भाष्य केले. तसेच भाजपाच्या राजकारणावरही जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, ‘कोणत्याही मोठ्या पक्षावर नाराज न राहता आपली झोपडी मोठी करण्यासाठी आपण काय ताकद लावली पाहिजे यावर आपण काम केले पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार, खासदार ज्यावेळी जास्त होतील त्यावेळी हे मोठे पक्ष आपल्याला दाबणार नाही तर सोबत घेतील.
‘आता त्यांची सध्याची भूमिका छोट्या पक्षांना दाबण्याची आहे. त्यांनी आम्हाला बोलावले नाही म्हणून काही फरक पडत नाही. कारण, आमच्या ताकदीच्या चिकाटीच्या जोरावर पक्ष देशपातळीवर कसा जाईल याची शपथ घेऊन आम्ही तीस वर्षांपूर्वी घराबाहेर पडलो होतो. मी माझ्या बळावर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आहेत त्यामुळे मला त्यांनी बैठकीला बोलावले काय किंवा नाही बोलावले तरी मला त्याची काही फिकीर नाही.’
महादेव जानकरांनी आपले उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढवले म्हणून जानकरांची ताकद आज विधानसभेत दिसत नाही असा प्रश्न विचारला असता जानकर म्हणाले, ‘असे बिलकुल नाही. आजही माझे दोन आमदार हे रासपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. मी आज जो विधानपरिषदेत आमदार आहे तो माझ्या पक्षाच्या चिन्हावर आहे. भाजपाच्या चिन्हावर लढलो नाही. आमच्याच पक्षात राहुल कुल आमदार होते त्यांनी ऐनवेळी एबी फॉर्म जोडला म्हणून ते भाजपाचे झाले. आता आमचे दोन आमदार आहेत. त्यांच्या पक्ष चिन्हावर लढण्याचा काहीच प्रश्न येत नाही.’
‘मोठे पक्ष नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करत असतात. मग छोट्या पक्षांनी आपल्या औकातीत राहिलं पाहिजे. त्यांनी आपली औकात वाढविली पाहिजे. त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही. मी ही त्यांच्यावर अवलंबून नाही. 2024 पर्यंत माझी आमदारकी आहे. त्याआधीच मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर दिल्लीत खासदार म्हणून जाईन’, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.
‘सध्या मी परभणी, बारामती, माढा आणि मिर्झापूर या चार लोकसभा मतदारसंघांतून तयारी करत आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मतदारसंघातून माझं तिकीट जवळपास फायनल झालं आहे. महाराष्ट्रातून परभणी की माढा कुठून लढायचं हे अद्याप निश्चित झालेले नाही.’ कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करणार का, या प्रश्नावर जानकर म्हणाले, ‘आम्हाला अद्याप कुणाकडूनही ऑफर आलेली नाही. त्याबद्दलही काहीच चर्चा झालेली नाही. जुन्या मित्रांनी आम्हाला ऑफर दिली नसली तरी नवीन मित्रांचीही ऑफर आली पाहिजे. ऑफर आल्यानंतर यावर सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ’, असे जानकर म्हणाले.