Download App

दिल्लीश्वरांनी फडणवीसांसह भाजप नेत्यांना झापलं; हाय व्होल्टेज बैठकीतील ‘अंदर की बात’ बाहेर

विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.

Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची मोठी (Maharashtra Lok Sabha Election) पिछेहाट झाली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या पण भाजपाची अवस्था अतिशय दयनीय झाली. मागील निवडणुकीत 23 जागा जिंकणारा भाजप यंदा फक्त 9 जागांवरच थांबला. राज्यात ना मोदींचा करिश्मा चालला ना देवेंद्र फडणवीसांचं मायक्रो प्लॅनिंग.. आता या पराभवाची कारणं शोधली (Devendra Fadnavis) जात आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांचे कान दिल्लीश्वरांनीच टोचले आहेत. विरोधकांनी तयार केलेला नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही, आता या चुका लगेच सुधारा, जुन्या नेत्यांना सोबत घ्या आणि विधानसभेची तयारी करा.. अशा सूचना भाजप वरिष्ठांनी महाराष्ट्र कोअर कमिटीला दिल्या आहेत.

विरोधकांचा नरेटिव्ह खोडता आलाच नाही

महाराष्ट्रातील कोअर कमिटीच्या नेत्यांची काल राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महायुतीच्या पराभवाच्या कारणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपाचं चुकलं कुठं याची माहिती श्रेष्ठींनी घेतली. तसेच महाराष्ट्रात कोणा एकाच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा. जुन्या नेत्यांना सोबत घ्या. इच्छुक उमेदवारांना आतापासूनच तयारी करायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका, असेही दिल्लीतील वरिष्ठांनी सांगितले.

फडणवीसांचं नेतृत्त्व, धन्यवाद यात्रा अन् विधानसभा; महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग

महाराष्ट्र भाजप नेत्यात समन्वयाचा दुष्काळ

राज्यात लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी अनेक नरेटिव्ह पसरवले. यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. विरोधकांचा हा नरेटिव्ह खोडून काढण्यात भाजपाचे नेते कमी पडले. या नेत्यांना, सोशल टीमला पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडता आली नाही. विरोधकांनी भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देता आलं नाही. विरोधकांनी सोशल मीडियात जे मुद्दे मांडले त्यांची उत्तरं देण्यात भाजप नेते कमी का पडले? असा सवाल पक्षनेतृत्वाने या बैठकीत विचारला. आता निदान विधानसभा निवडणुकीत तरी यात सुधारणा करा. सोशल मीडियाचा वापर अधिक प्रभावीपणे करा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

सोशल मीडिया वापरा, विरोधकांना उत्तरं द्या

राज्यात यंदा भाजपाची मोठी पिछेहाट झाली. अनेक बालेकिल्ले ढासळले. केंद्रीय मंत्र्यांचाही पराभव झाला.  मागील निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा फक्त 9 जागा मिळाल्या. या कामगिरीवर पक्ष श्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मविआने सेट केलेला नरेटिव्ह, मराठा आरक्षण, कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा रोष या मुद्द्यांना हाताळून वेगळी रणनीती आखण्यात भाजप नेते सपशेल अपयशी ठरले. या प्रचाराला सोशल मीडियातून उत्तरं देण्यात तुम्ही कमी पडलात अशी जाणीव वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीत करून दिली.

पटना, सारण अन् भागलपूर..धडाधड कोसळले पूल; भ्रष्टाचार की निकृष्ट बांधकाम?

फडणवीसांचा राजीनामा नाकारला

राज्यातील पराभवानंतर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. वरिष्ठांनी मात्र त्यांची ही विनंती नाकारली. राजीनामा देऊ नका काम करत राहा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. यानंतर आता फडणवीसांच्या राजीनाम्याचा मुद्दा मागे पडला आहे. राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना राज्यातील भाजप नेत्यांना या बैठकीत देण्यात आल्या.

follow us