Maharashtra Politics : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आता अजित पवार यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. यानंतर शरद पवार गटाने पक्षासाठी दुसरे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. या घडामोडी ऐन लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जवळ आलेल्या असताना घडल्या आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
या दोन्ही घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान दिले गेले आहे. आता कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल पण या दोन घटनांचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार हे नक्की.
आता या परिणामांचा विचार करताना दोन गोष्टी विचारात घ्याव्या लागतील त्या म्हणजे महविकास आघाडी, इंडिया आघाडीच भवितव्य काय राहणार आणि दुसरे म्हणजे या राजकारणाचा भाजपला काय फायदा होऊ शकतो. अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे भाजपबरोबर (Eknath Shinde) आल्याने राज्यातील 48 मतदारसंघात भाजपला अनुकूल वातावरण तयार होईल का हा सुद्धा प्रश्न आहेच.
‘विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी मोदींना सांगतो’; आई, अन् मुलाची राजकीय कारकीर्द काढत राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे विरोधी पक्षांत चलबिचल सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या नावाने ओळखली जात असली तरी अजित पवार यांनी सुद्धा मागील काही वर्षांत आपली स्थिती मजबूत केली आहे. आजमितीस अजितदादांकडे मोठा जनाधार आहे. त्यामुळेच ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केले त्यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल यांच्यासारखे नेते त्यांच्याबरोबर गेले. या नेत्यांमुळेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस उभी होती. आता हे सगळे नेते शरद पवार यांच्या विरोधात आहेत. निवडणुकीतही विरोधात प्रचार करताना दिसतील याचा परिणाम नक्कीच होणार आहे.
उद्धव ठाकरे गटावर काय परिणाम?
उद्धव ठाकरे यांनाही एकनाथ शिंदे यांनी जोरदार झटका दिला. या झटक्यातून सावरून पुन्हा पक्षाची घडी बसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. परंतु त्यांच्याकडे आता जास्त पर्याय शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांची सगळी भिस्त आता जनतेवर आहे. या सगळ्या पडझडीत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फक्त एक गोष्ट सकारात्मक दिसत आहे ती म्हणजे लोकांची सहानुभूती. जरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे तरी लोकांची सहानुभूती मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने असल्याचे दिसत आहे.
ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचा ताबा घेतला त्यामुळे उद्धव ठाकरे एकाकी पडले. आता याच परिस्थितीचा फायदा उद्धव ठाकरे घेऊ शकतात. भारतीय राजकारणात सहानुभूती हा असा फॅक्टर आहे जो एकदा चालला तर बाकी सारी समीकरणे क्षणात उध्वस्त होतात. याची उदाहरणेही घडली आहेत.
“PM मोदींचे काम पाहून इम्प्रेस झालो…” : भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाणांची स्तुतीसुमने
हाच अँगल शरद पवार (Sharad Pawar) यांनाही लागू राहणार आहे. मागील चाळीस वर्षांपासून राजकारणात असलेले शरद पवार आज वयाच्या 83 वय वर्षी सुद्धा संघर्ष करण्याची भाषा करतात त्यावेळी लोकांच्या मनात सहानुभूतीची भावना तयार होतेच.
दोघांपुढे सर्वात मोठे आव्हान कोणते?
आजमितीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक समान संकट आहे. ते म्हणजे दोघांनाही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी लागणार आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे असेच समजले जात होते. पण आज दोघांकडे मूळ पक्ष नाही आणि चिन्हही नाही. ज्यावेळी प्रत्यक्ष मतदानाची वेळ येईल त्यावेळी दोघांचे पक्ष वेगळे नाव आणि चिन्हासह मतदारांसमोर उभे असतील. अशा परिस्थितीत लोकांना कसे समजावून सांगता येईल की त्यांना शिवसेना किंवा राष्ट्रवादीला नाही तर त्यांच्या नव्या पक्षाला मतदान करायचे आहे यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही बहुतांश मतदार पक्षाचे नाव आणि चिन्ह डोक्यात ठेवून मतदान करतात. त्यामुळे जितक्या लवकर नव्या पक्षांची माहिती लोकांपर्यंत होईल तितक्या प्रमाणात या नेत्यांचा फायदा होईल.
राज्यातील सध्याच्या राजकारणाचा परिणाम फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पर्यंतच मर्यादित राहिलं असे नाही. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी आहे. या आघाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणूक लढण्याची तयारी केली जात आहे. परंतु सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडी यांची वाटचाल सोपी राहिलेली नाही.
भाजपवर कसा परिणाम?
जर या दोन्ही पक्षात फूट पडली नसती तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी आणि शहरी भागात शिवसेनेकडून भाजपला (BJP) जोरदार टक्कर मिळाली असती. परंतु आता ही दोन्ही समीकरणे आघाडीच्या विरोधात गेली आहेत. आता या बदललेल्या राजकारणाचा सर्वात जास्त फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी आव्हान मिळण्याची शक्यता होती तिथे सुद्धा भाजपची वाट सोपी राहणार आहे. राज्यात सध्या भाजपकडे 23 खासदार आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे बरोबर आल्याने ग्रामीण, शहरी भागाचे बरेचसे टेन्शन कमी झाले आहे. अशा परिस्थितीत भाजप आपल्या संख्याबळात वाढ करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार.
राज्याच्या सहकारात आजही राष्ट्रवादीचा दबदबा आहे. सहकारी संस्थांमधील कोट्यवधी लोक राष्ट्रवादीचे मतदार आहेत. आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने हे हक्काचे मतदानही दोन गटात विभागले जाणार आहे. अजित पवार यांच्या रूपाने सहकारातील मतदान काही प्रमाणात महायुतीकडे वळणार आहे.