Download App

“बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले

जालना : मराठा समाजाशी आता बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे लागले. जर सरसकटचे आश्वासन नव्हते तर सरकारने वेळ घेतलाच कशाला? आम्ही सरसकटसाठीच त्यांना वेळ दिला होता, तसंच आधीचा जीआर परत कशाला नेला? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आशिष देशमुख यांना फटकारले. ते अंतरवाली सराटी गावातून 13 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. (Maratha reservation agitator Manoj Jarange Patil slammed BJP leader Ashish Deshmukh)

काल (29 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप नेते आशिष देशमुख उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ओबीसी समाज आणि सरकारची बैठक अतिशय सकारात्मक पार पडली. मराठा समाजाला सरकार ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नाही, याच आश्वासन आम्हाला दिलं आहे. जरांगे पाटील यांनी समजदारीनं विचार करावा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण हे शक्य नाही, असे ते म्हणाले होते. यावर मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण; CM एकनाथ शिंदेंची ग्वाही

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

गेल्या 70 वर्षांपासून मराठा समाजाने समजूतदार पणाचीच भूमिका घेतली आहे. पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सरसकट मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे, आरक्षण सरसकटच द्यावं लागेल. जर सरसकट द्यायचं नव्हतं तर सरकारने वेळ घेतलाच कशाला? सरकराने समिती कशासाठी स्थापन केली?आम्ही सरसकटसाठीच त्यांना वेळ दिला होता, तसंच आधीचा जीआर परत कशाला नेला? एवढी बनवाबनवी समाजाशी होऊ शकत नाही आणि सरकार करणारही नाही, असा आशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

Rohit Pawar : ‘त्या’ दोन नेत्यांची नावं जाहीर कराच! शिरसाटांचं रोहित पवारांना थेट चॅलेंज

मनोज जरांगे 13 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर :

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठीजरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ देत उपोषण स्थगित केले होते. उपोषण स्थगित करताना त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेणार तसेच राज्याचा दौरा करणार असल्याचेही सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आजपासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. आरक्षणासाठी मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेसाठी देखील जरांगे पाटील या 13 जिल्ह्यांतील समाजबांधवांना आवाहन करतील. ते राज्यातील 13 जिल्ह्यांत दौरा करणार असून या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील (Jalna) आंतरवाली सराटी गावातून होणार आहे. जरांगे जालना जिल्ह्याबरोबरच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही ते जाणार आहेत. सोलापूर, नगर, नाशिक, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

Tags

follow us