बीड-शिरूर रोडवरील नागऱ्याची वाडी (Beed) परिसरात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण कार अपघातात बीड शहरातील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. आजच्या या धुलीवंदनाचा सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड शहरातील रामतीर्थ परिसरातील रहिवासी असलेला कृष्णा जालिंदर मुळे (वय २२) हा आपल्या काही मित्रांसोबत धुलिवंदन साजरा करण्यासाठी शेजारील जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर जाण्याचं नियोजन करून निघाला होता. या सहलीसाठी मित्र परिवाराने व्हेरना आणि थार अशा दोन गाड्यांमध्ये ते चालले होते.
धक्कादायक! बीडच्या माजलगावमध्ये 2 सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न, काय घडलं?
पहाटेच्या सुमारास हे सर्व जण बीडहून शिरूर कासारमार्गे निघाले होते. प्रवास सुरू असताना नागऱ्याची वाडीजवळ पोहोचल्यावर व्हेरना कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, चालकाचे नियंत्रण सुटल्याबरोबर कारने रस्त्यावरच तीन ते चार पलट्या खाल्ल्या. अनियंत्रित झालेली ही कार शेतातील एका विहिरीच्या दिशेने वेगाने गेली. विहिरीच्या सिमेंटच्या कठड्याला जाऊन जोरदार धडकली आणि कठड्याला लटकली.
या भीषण धडकेत कृष्णा जालिंदर मुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत कारमध्ये असलेले प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक मित्र असे तिघेजण जखमी अवस्थेत पडले होते. त्यांच्या पाठीमागून ‘थार’ गाडीत येत असलेल्या मित्रांनी अपघात पाहताच तात्काळ धाव घेतली आणि जखमींना गाडीबाहेर काढलं.
जखमींपैकी प्रसाद खोले याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. तर यश पेंढारे आणि त्यांच्या दुसऱ्या एका मित्रावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
