बीडमध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन (Dhas) तालुक्यांना समुद्रात वाहून जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पाला गती द्यावी, तसेच दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात, या मागणीसाठी नुकताच माजी आमदार भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान बाळासाहेब आजबे यांनी धस कुटुंबावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर धस आणि आजबे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चिघळला असून, काल आजबे यांनी पत्रकार परिषद घेत कागदपत्रे सादर करत धस कुटुंबावर पलटवार केला. त्यावर आज प्राजक्ता सुरेश धस यांनी आजबे यांना प्रत्युत्तर देत ‘तुमचे सहकारी कराड’ असा उल्लेख करत निशाणा साधला.
प्राजक्ता धस यांनी आजबे यांच्या तवलवाडी व्हिडिओ प्रकरणाच्या उल्लेखावरूनही पलटवार केला. ‘तिथला कार्यकर्ता मला मदत करा म्हणून म्हणाला, म्हणून मी तिथे गेले होते. मात्र तिथे वेगळंच षडयंत्र रचलं होतं. ते काय षडयंत्र होतं, हे तुमचे सहकारी राम खाडे आणि जेलमधील वाल्मिक कराड चांगलं सांगतील,’ असं म्हणत त्यांनी आजबे यांच्यावर आरोप केला. तसेच आजबे यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिल्याचं सांगत, ‘त्याचंही मी स्वागत करते,’ असं प्रत्युत्तर दिलं.
आष्टी-पाटोदा-शिरूरच्या पाण्यासाठी एल्गार; धोंडे-आजबेंच्या नेतृत्वात जल आक्रोश मोर्चा
यावेळी रामाची जमीन आजबे यांच्याकडं आहे असा आरोप प्राजक्ता धस यांनी केला. तसंच, त्या देवस्थानची जमीन यांच्याकडं असूनही त्या देवस्थानची अवस्था किती बिकट आहे याच्याकडंही त्यांनी यावेळी लक्ष वेधलं आहे. त्याचबरोबर आजबे हे आमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून म्हणाले आहेत, तर मी त्यांच्या या निर्णयाचं स्वागतच करते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही या वादावर भाष्य केलं. ‘धस यांनी मोर्चाला विरोध करण्याऐवजी किंवा लोकांना रोखण्यापेक्षा स्वतः सहभागी व्हायला हवं होतं. आम्ही त्यांचं स्वागतच केलं असतं,’ असं धोंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले. मात्र, मोर्चाला मार्गदर्शन करताना आजबे आणि धोंडे या दोघांनीही सुरेश धस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यामुळे दुष्काळी प्रश्न आणि पाणीप्रश्नासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाला पुढे राजकीय संघर्षाचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
