Download App

अजितदादांच्या आणखी एका आमदाराला पवारांचा धक्का; भाजपमधील थेट माजी मंत्र्यांलाच फोडलं

लातूर : माजी राज्यमंत्री आणि अहमदपूरचे माजी आमदार विनायक जाधव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये खूप गर्दी झाली आहे, त्यामुळे माझी कुचंबना होत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) राम-राम ठोकला. विनायक पाटील (Vinayak Jadhav-Patil) हे यापूर्वी 1999 आणि 2014 या निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार राज्यमंत्री होते. (Former Minister of State and former Ahmedpur MLA Vinayak Jadhav-Patil joins NCP (Sharad Pawar))

दरम्यान, त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना आगामी निवडणुकीत मोठे आव्हान मिळणार असल्याचे बोलले जाते. 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या आमदार बाबासाहेब पाटील यांनी नुकतेच अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी शरद पवार यांनी रणनीती आखली आहे.

Vijay Vadettiwar : पुन्हा येऊ शकत नाही, हे माहिती असल्याने ट्विट डिलिट; वडेट्टीवारांचा टोला

त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपमधील माजी आमदार, भाजपमधील डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये  बी. एस. पाटील, शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा, भंडारा-गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले आहे.

आता विनायक पाटील यांच्या रुपाने शरद पवार यांनी बाबासाहेब पाटील यांच्याविरोधात पर्याय शोधल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून बाबासाहेब पाटील तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून विनायक पाटील यांच्यात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यात बाबासाहेब पाटील यांना भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) तर विनायक पाटील यांना काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाची साथ मिळणार आहे.

कोण आहेत विनायक पाटील?

1999 मध्ये विनायक पाटील पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पाठिंबा दिला आणि राज्यमंत्रीही झाले. 2004 च्या निवडणुकीत ते काँग्रेसकडून लढले. मात्र भाजपच्या बब्रुवान खंदाडे यांनी त्यांचा पराभव केला. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा विनायक पाटलांवर विश्वास दाखवला, तर भाजपनेही बब्रुवान खंदाडे यांना मैदानात उतरविले. पण या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला.

2014 मध्ये बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर विनायक पाटील यांनी भाजपकडून उमेदवारीची चाचपणी केली. पण भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांना प्रचंड विरोध झाला. त्यानंतर ते अपक्ष मैदानात उतरले आणि विजयीही झाले. विजयी होताच त्यांनी भाजपला पाठिंबाही दिला. पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांनी विनायक पाटलांचा विजय रथ थांबवला.

Devendra Fadnavis video : ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडिओ भाजकडून डिलिट, भाजपने केली सारवासारव

त्यावेळी भाजपमधील अंतर्गत बंडखोरीचा पाटील यांना प्रचंड फटका बसल्याचे बोलले गेले.  पाटील यांच्या उमेदवारीला सुरवातीपासून भाजपमधील नेत्यांचा विनायकराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता. यामुळे भाजपातील दिलीपराव देशमुख आणि अयोध्या केंद्रे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली.  भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी विनायक पाटील यांच्याविरूद्ध उघडपणे दिलीपराव देशमुख आणि अयोध्या केंद्रे यांचा प्रचार केला. याचा थेट फायदा बाबासाहेब पाटील यांना झाला.

Tags

follow us