Imtiaz Jaleel PC : छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरेंचे (Sandipan Bhumre) ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूल (Javed Rasool) यांच्या नावावर जालना रोडवरील सालारजंग इथली तब्बल १५० कोटी रुपयांची जमीन करण्यात आली. हैदराबादमधील नवाबाच्या वंशजाने ही जमीन नावावर केल्याचं प्रकरण नुकतचं समोर आलं होतं. पण, हा बोगस नवाब असून या जमीन व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला.
तसेच हा 150 कोटींचा घोटाळा नसून तब्बल 500 कोटींचा घोटाळा असून हा व्यवहार अवघ्या 500 रुपयांच्या बॉण्डवर झाल्याचं जलील म्हणाले.
इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले,
बोगस नवाबाला हाताशी धरून खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर तीन एकर नाहीतर कोट्यावधींची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. पाचशे रुपयांच्या बॉन्डवर हिबानामा करून सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये पीआर कार्ड करताना अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आलं आहे. रातोरात या जमिनी ड्रायव्हर जावेदच्या नावावर करून घेतल्या गेल्या. एवढेच नाही तर जमिनीची रजिस्ट्री न करता हा व्यवहार झाला आहे. त्यामुळं सरकारचं ६ कोटी १८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं जलील म्हणाले.
अरविंद भोसलेंची नवी कलाकृती, पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा!
रात्री अकरा वाजता हे व्यवहार झाले. या प्रक्रियेत सरकारी अधिकारी, बडे नेते आणि पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोपही जलील यांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
दरम्यान, जलील यांनी केलेल्या आरोपांमुळं हे संपूर्ण प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. जलील यांनी केलेल्या आरोपांवर आता भुमरे काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.