बीडमध्ये बोगसगिरीने शिखर गाठल असल्याचं समोर आलं आहे. (BEED) साहेब, अजून मी जिवंत आहे, असं सांगण्याची वेळ एका 80 वर्षांच्या वृद्धावर आली. हक्काचं घर असताना मृत्यू प्रमाणपत्र आणि शपथपत्राच्या आधारे एका वृद्धाला चक्क 16 वर्षांपूर्वीच मृत दाखवलं आणि नगरपालिकेच्या पीटीआरवर अन्य दोघांच्याच नावे घर करण्यात आलं.
नेमकं घडलं काय?
बीडमधील रविवार पेठ, तेली गल्ली परिसरात 80 वर्षांचे सुभाष विठ्ठलराव दहीवाळ राहतात. त्यांची पेठ बीड भागातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये जागा आहे. जुना 2-6-259 तर नवीन -2-6-276 असा मालमत्ता क्रमांक आहे. दहीवाळ यांच्या नगरपालिकेच्या पीटीआरवर 2010 मध्ये मालकाचे नाव अचानक बदलण्यात आले. सुभाष दहीवाळ यांचा मृत्यू झाल्याचे शपथपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे दाखवण्यात आले.
16 वर्षांपूर्वीच दहीवाळ यांचा मृत्यू दाखवून घर दुसऱ्याच्याच नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. 1 ऑगस्ट 2010 रोजी सुभाष यांच्या नावावर वर्तुळ मारून त्याऐवजी बाबासाहेब तुळजाराम बेदरे व त्यानंतर उज्ज्वला बाळासाहेब बेदरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.
ही माहिती मिळताच 80 वर्षांच्या सुभाष दहीवाळ यांना धक्का बसला. त्यांनी बीडच्या न्यायालयात दावा दाखल केला आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. साहेब, मी अजून जिवंत असतानाच मृत का दाखवले? असा सवाल दहीवाळ यांचा असून माझे घर मला मिळावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
