बीडमध्ये खळबळ! जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह

सचिन जाधवर मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षांत ते बीडच्या जीएसटी कार्यालयात ऑफिसर म्हणून कार्यरत होते.

News Photo   2026 01 19T144917.889

बीडमध्ये खळबळ! जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह

गेल्या वर्षभरात नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चर्चेत असलेले (Beed) बीड पुन्हा एकदा जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यूने चर्चेत आलं आहे. काल एका जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये अज्ञातस्थळी संशयास्पद आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. बीड जवळील कपिलधारवाडी परिसरात राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह गाडीत आढळून आला, त्यानंतर सदर ठिकाणी पोलिसांकडून फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला.

पीएम रिपोर्ट नंतर जाधवर यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, मात्र घटनास्थळावर सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. जीएसटी अधिकऱ्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली, आता याच सुसाईड नोट आधारे संबंधिताची चौकशी केली जाणार आहे. तत्पूर्वी, सदरील प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आता, उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार पुढील कारवाई बीड पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती बीडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.

शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ

सचिन जाधवर मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षांत ते बीडच्या जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी राहत्या घरातून बाहेर पडलेले सचिन जाधवर शनिवार पर्यंत घरी पोहोचले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे जाधवर यांचा शोध घेतला असता बीड जवळील कपिलधारवाडी परिसरात त्यांचा मृतदेहच गाडीत संशयास्पदरित्या आढळून आला.

घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू केला. शवविच्छेदना, दरम्यान जाधवर यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली आणि यात आत्महत्येचं कारण वरिष्ठाच्या त्रासाचे नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याचं बीड पोलिसांनी सांगितले.

सचिन जाधवर 2012 च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आले होते. सर्वांशी मनमिळावू असलेले जाधवर यांच्या मृत्यूचे गूढ संशयास्पद आहे. बंद कारमध्ये मडक्यात कोळसा आणि लाकूड जाळून धूर केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं. त्यामुळे या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. आढळून आलेल्या सुसाईड नोट वरून सचिन जाधवर यांच्या मृत्यूचे कारण समोर येत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केलेल्या चौकशीत नेमकं काय समोर आलं. जाधवर यांच्या मृत्यू मागील ठोस कारण काय? असे अनेक प्रश्न बीड पोलिसांना सोडवायचे आहेत.

Exit mobile version