Jalna lathi charge : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या ह्या नव्याने तयार झाल्यात नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी सर्व समाजाच्या भावनांचा आदर करुन न्याय मिळून देण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करत होतो. त्यावेळी आंदोलन करणारे तुम्हीच होता आणि पोलीसही तेच होते मग का लाठीहल्ला झाला नव्हता? त्यावेळीही लढा सुरुच होता. मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषण सुरु होते पण त्यावेळी लाठ्या चालवल्या नव्हत्या. मग आताच काय झाले? अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री असताना ज्यावेळी मराठा संघटनांनी भेटण्याची वेळ मागतली त्यावेळी आम्ही भेटून चर्चा केली. त्यावेळी माझ्यासोबत अशोक चव्हाण देखील होते. शक्य नव्हते त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देखील चर्चा केली होती. या सरकार एवढे निर्गुण सरकार माझ्या पाहण्यात आले नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; CM शिंदेंचा मराठा समाजाला शब्द
उद्धव ठाकरे यांनी अंतरवाली सराटी गावात आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री आशोक चव्हाण उपस्थित होते.
राज्यभरातून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर तुमच्या भेटीला आलो. केंद्र सरकारने गणपतीच्या दिवसांत संसदेचे अधिवेशन ठेवले आहे. मराठा समाजाला न्याय द्या, धनगर समाजाला न्याय द्या, एक फूल आणि दोन हाप सरकारचं काम शून्य आहे. काम काही नाही. पण सरकार आपल्या दारी. सरकारमध्ये असताना आम्ही तुम्हाला भेटत होतो. आता कोणीही नाही तरी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला भेटायाला आलो आहे, असंही ठाकरे म्हणाले.