Jayakwadi Dam : अहमदनगर व नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीला पाणी (Jayakwadi Dam) सोडण्यात येऊ नये. यासाठी अनेक आंदोलने झाली. नगर जिल्ह्यात यासाठी राजकीय नेतेमंडळी तसेच लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला एकत्रित येत ठराव देखील झाला. मात्र न्यायालयाने जायकवाडीला पाणी सोडण्यात यावे असा निर्णय दिला. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नगर जिल्हयातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले.
न्यायालयाचा निर्णय कायम अन् पाणी झेपावले…
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याने नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राज्य सरकारच्या आदेशानंतर नाशिक, नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडलं जात आहे.
Ahmednagar Crime : धक्कादायक! जागेच्या वादात माय लेकरांचा बळी; शेजाऱ्याने थेट अंगावरच…
मराठवाड्यासाठी नाशिकच्या दारणा धरणातून 100 क्यूसेक वेगांनं जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच भंडारदरा -निळवंडे धरण समुहातुन 100 क्यूसेक्स पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून देखील उद्या म्हणजेच रविवार (26 नोव्हेंबर) रोजी पाणी सोडलं जाणार आहे.
पाण्यावरून राजकारण तापले
नगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने अल्पप्रतिसाद दिला होता मात्र धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला होता. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने यंदाच्या वर्षी पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली होती. यातच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात असल्याने जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी राजकीय नेत्यांचा एकमुखी ठराव देखील झाला होता. मात्र मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने अखेर पाणी सोडण्यात आले.
चार डिसेंबरपर्यंत जमावबंदी
श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी व शेतकऱ्यांकडून काही अनुचित प्रकार केला जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच जमावबंदी आदेश लागलेल्या ठिकाणांवर कोणीही गर्दी करु नये, म्हणून या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहील. या कालावधीत या ठिकाणांच्या आजूबाजूस 500 मीटरपर्यंतचे परिसरात कार्यकारी अभियंता, नगर पाटबंधारे विभाग अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी व वाहने यांना वगळता कोणालाही प्रवेश करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.