Download App

छ.संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी जोरदार राडा; एकमेकांच्या अंगावर जात मनसे अन् ठाकरे गट भिडले

छत्रपती संभाजीनगर शहरात मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शहरातील क्रांती चौकात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. मात्र त्याआधीच छत्रपती संभाजीनगर शहरात मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शहरातील क्रांती चौकात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि जोरदार घमासान सुरू झाले. उठ दुपारी घे सुपारी, मनसे आणि दोनशे अशा घोषणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनीही वीस रुपये वाटले. हा सर्व राडा आज दुपारी भर उन्हात शहरातील क्रांती चौकात सुरू होता. या प्रकाराची माहिती मिळतात पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेही याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्यावर घणाघाती टीका केली. भुमरेंचा दारुचा व्यवसाय आहे. तुम्हाला दारू पाहिजे की पाणी असा सवाल त्यांनी केला. तर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे म्हणाले, की त्यांनी मुद्दाम डिवचण्याचं काम केलं. गद्दारांना जनता माफ करणार नाही.

वर्ष दोन वर्षांचं सरकार अन् आघाडी पॉलिटिक्स फेल; इतिहासातील ‘सरकारं’ही औटघटकेची..

छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिलं आहे. तर महायुतीने मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत मनसेचा उमेदवार नाही. तरीही मनसेने महायुतीला पाठिंबा दिला आहे. काल पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली होती. आता त्यांची पुढील सभा ठाण्यात होणार आहे.

निवडणुकीत उमेदवार नसतानाही मनसेकडून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला जात असल्याने महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ झाले आहेत. कारण राज ठाकरे यांच्या सभांचा काहीतरी परिणाम होणार याची जाणीव त्यांनाही आहे. त्यानंतर आता दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांतील वादाचा हा प्रसंग घडला आहे. संभाजीनगरच्या क्रांती चौकात दोन्ही उमेदवारांचे समर्थक आमनेसामने आले होते. मनसेचे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

मनैसनिक पैसे घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप मविआकडून केला जात आहे. त्यामुळेच येथे मनसे आणि दोनशे, उठ दुपारी आणि घे सुपारी अशा घोषणा ठाकरे गटाकडून दिल्या जात होत्या. या घोषणांना प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून येथे वीस रुपये वाटण्यात आले. आज दुपारी रणरणत्या उन्हात क्रांती चौकात हा राजकीय ड्रामा सुरू होता. यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

“खैरेंना लोकशाही कळालीच नाही, येत्या निवडणुकीत…” संदीपान भुमरेंच चंद्रकांत खैरेंना आव्हान

follow us

वेब स्टोरीज