चंद्रकांत खैरे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील दुश्मनी, दोघांचीही जिरवणारी!

  • Written By: Published:
चंद्रकांत खैरे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील दुश्मनी, दोघांचीही जिरवणारी!

Chandrakant Khaire Vs Harshwardhan Jadhav दोन नेत्यांतील दुश्मनी एकमेकांचे राजकीय करीअर कसे उद्वस्त करू शकते, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण या वेळी नक्की आठवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्यात  रंगणारा सामना. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची अशी जिरवली की त्यामुळे ते माजी झाले आहेत. आता लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत.

अनेक पक्ष फिरून आलेल्या आणि नेहमीच वादात अडकणाऱ्या जाधव यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. येथून शिवसेनेच्य उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैर हे उमेदवार आहेत. एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तिआज जलील हे पुन्हा रिंगणात असणार आहेतच. महायुतीचा उमेदवारही रिंगणात असणार आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या निर्णयामुळे ही निवडणूक चौरंगी होणार आहे.

जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. स्वाभाविकपणे याचे उत्तर आहे ते चंद्रकांत खैरे. यासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर खैरे यांच्या पराभवाचे कारण स्पष्टपणे दिसून येते.

२०१९ मध्ये काय घडले?

संभाजीनगर हा शिवसेनेचे १९८९ पासून बालेकिल्ला राहिला आहे. त्यात खैरे १९९९ पासून खासदार राहिलेले. २०१९ मध्ये ते पाचव्यांदा खासदार होण्याच्या तयारीत होते. पण तेथे जाधव यांनी आडकाठी घातली. खैरे यांच्याविरोधात त्यांनी अपक्ष उमेदवारी लढविली. यात एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तिआज जलील हे धक्कादायकरित्या निवडून आले.

या निवडणुकीत जलील यांना  389,042 तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खैरे यांना 3,84,550 मते मिळाली. खैरे यांचा फक्त 4492 मतांनी पराभव झाला. या पराभवाला निमित्त ठरले ते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव. कारण यांना तब्बल 2,83,798 इतकी मते मिळाली होती. खैरे यांची मते खाण्याचे काम जाधव यांनी उत्कृष्टपणे केले. या निकालानंतर जलील यांनी जाधव यांना मतदान केंद्रातच मिठी मारली होती. तेव्हाच जलील यांच्या विजयामागचा खरा चेहरा कोण याची खात्री पटली होती.

पत्नीचा पराभव जाधव यांच्या जिव्हारी

पण जाधव हे खैरे यांच्यावर एवढ खार खाऊन का होते, या प्रश्नाचे उत्तर हे 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळते. खैरे हे तेव्हाही शिवसेनेचे खासदार होते. हर्षवर्धन जाधव हे देखील कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणूनच 2014 मध्ये निवडून आले होते. त्या आधी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार होते. पण त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि दुसऱ्यांदा आमदार झाले. जाधव यांचे फार काळ कोणाशी सख्य राहत नाही. त्यांच्या स्वभावात तो फार मोठा दोष आहे. पण खैरेंशी पंगा घेण्याला आधी म्हटल्याप्रमाणे 2017 ची जिल्हा परिषद निवडणूक कारणीभूत ठरली. या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या तत्कालीन पत्नी आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या कन्नड तालुक्यातील पिशोर सर्कलमधून रिंगणात होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला. आमदाराच्या पत्नीचा पराभव तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. त्या वेळी काॅंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि खैरे यांची पडद्याआड मैत्री झाली. या दोघांनी मिळून आपल्या पत्नीचा पराभव केला, असा संशय जाधव यांना आला. तेथूनच मग जाधव आणि खैरे यांच्याती वाद पेटला.

दोघेही एकमेकांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करत होते. एकमेकांवर जाहीर तोंडसुख घेत होते.  खैरे हे खासदारकीच्या निधीवाटपात टक्केवारी घेत असल्याचा आरोप करत जाधव यांनी लढाईला तोंड फोडले. खैरे यांना पुन्हा खासदार होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला. २०१९ च्या निवडणुकीत खैरे यांना पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळवू नये यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. तरीही ठाकरे यांनी खैरेंवरच विश्वास टाकत त्यांना पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवले.

जाधव यांची ताकद किती?

त्याच वेळी मराठा आरक्षणाचे वारे जोरात वाहत होते. जाधव यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. हे आरक्षण मिळावे म्हणून आमदारकीचा राजीनामाच त्यांनी दिला. त्यामुळे ते एकमद प्रकाशझोतात आले. त्याचा त्यांना फायदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झाला. मराठा समाजाने त्यांना उचलून धरले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवूनही त्यामुळे त्यांना २ लाख ८४ हजार मते मिळाली. ही मते खैरे यांचा पराभूत करण्यासाठी पुरेशी ठरली. त्यामुळे अनपेक्षितरित्या इम्तिआज जलील हे खासदार झाले. याचा बदला खैरे यांनी सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत घेतला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणे शक्य नव्हतेच. त्यामुळे ते अपक्ष उमेदवार म्हणून  निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यांचा पराभव शिवसेनेच्या देवीसिंह राजपूत यांनी केला.

आता या दुश्मनीच्या ड्राम्याचा पार्ट -२ पुन्हा सुरू करण्याची घोषणा जाधव यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांत जाधव यांच ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. पत्नी संजना हीच माझा राजकीय वारसा चालविणार असल्याची घोषणा केली. पण निवृत्तीच्या घोषणेनंतर ते पुन्हा सक्रिय झाले. त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक कलह सुरू झाला. ते काही काळ पुण्याच्या तुरुंगातही होते. रावसाहेब दानवे यांच्याशीही त्यांचे वाद सुरू आहेत. सासऱ्यांवर खालच्या पातळीवर टीका करताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.  पहिल्या पत्नी संजना यांच्यापासून ते विभक्त झाले आहेत. या दोघांतील संघर्ष  इतका पेटला होता की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात पॅनेल उभे केले होते. हर्षवर्धन जाधव यांनी ईशा झा या मैत्रीणीशी दुसरा विवाह केला.

मतदारसंघातील त्यांचा संपर्क हा पहिल्यासारखा नाही. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनापासूनही ते लांब होते. नंतर त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाधव यांना पुन्हा २०१९ प्रमाणे मते मिळतील का, याची शंकाच आहे. पण त्यांच्या कन्नड विधानसभा मतदारसंघात जाधव यांची ताकद आहे. त्यांचे वडिल रायभान जाधव यांनी हा मतदारसंघ बांधला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि हर्षवर्धन यांच्या मातोश्री तेजस्वीनी जाधव या देखील आमदार होत्या. त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियांची कन्नडमध्ये ताकद आहे. या साऱ्या बळावर खैरे यांची जिरविण्यासाठी जाधव पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यामुळे जलील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले असेल आणि खैरेंचे टेन्शन वाढले असेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज