मी पक्षासाठी लाठ्या खाल्ल्या, हा नंतर आला अन् येऊन काड्या करतो; खैरेंनी घेतला दानवेंचा समाचार

Chandrakant Khaire : लोकसभा निवडणुकीपासूनच ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता पुन्हा एकदा दानवे आणि खैरेंमधला वाद विकोपाला गेलाय. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. शिवसेना (Shivsena) मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचं काम करतो, असा घणाघात खैरेंनी केलाय.
चंद्रकात खैरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या मेळाव्याला खैरेंनी यांनी दांडी मारली होती. याविषयी विचारले असता खैरे म्हणाले की, कालच्या पक्षाच्या कार्यक्रमाबाबत मला कुणी सांगितलं नव्हतं. या मेळाव्याबाबत अंबादासनेही मला काहीही सांगितलं नाही. आता तो स्वत:ला मोठा समजतो. तुम्ही काय आम्हाला कचरा समजता का? मी उद्धव साहेबांना याबद्दल सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. मी सुरूवातीपासूनच शिवसेनेचा नेता आहे. शिवसेना मी वाढवली, लाठ्या काठ्या खाल्या. जेलमध्ये गेलो… हा नंतर आला आणि काड्या करण्याचं काम करतोय, असं खैरे म्हणाले.
फेक एन्काऊंट कसा करतात?, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची… कासलेंचे खळबळजनक दावे
पुढं बोलताना म्हणाले, काड्या करणं मला आवडत नाही. आणि मला कुणीही काढूही शकत नाही. माझ्या पक्षासाठी मी काहीही करेल. मी माझं आंदोलन करणार, माझं आंदोलन माझ्या पक्षाचं आंदोलन असेल. तो करेल नाही तर नाही करेल, मला माहिती नाही. अंबादास दानवेमुळं शिवसेनेतील अनेक लोक फुटले, या माणसाने काय केलं सांगा. अनेक लोक सोडून जात आहेत, असंही खैरे म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेला आता अंबादास दानवे काय प्रत्युत्तर देणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.
भुमरेंची दानवे-खैरेंवर टीका
खासदार संदीपमन भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे. भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांनी आता घरी बसून नातवंड सांभाळावी, असा टोला भुमरे यांनी लगावला. तस अंबादास दानवे हे कागदोपत्री नेते असल्याची टीका भुमरे यांनी केला. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची वाट लावली, अशी देखील टीका भुमरे यांनी केला.