Download App

“अजितदादांनीच आम्हाला भाजपात पाठवलं, आमच्या रक्तात राष्ट्रवादी”; मल्हार पाटलांच्या वक्तव्याने खळबळ!

Malhar Patil Comment on Ajit Pawar : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची राज्यभरात चर्चा होत असताना मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही भारतीय जनता पक्षात गेलो होता. अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि आता ते भाजपसोबत आले, असा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी एका सभेत केला. मल्हार पाटील हे धाराशिव मतदारसंघातील अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र आहेत. मल्हार पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loksabha Election : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; अर्चना पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं

मल्हार पाटील धाराशिव जिल्ह्यात आयोजित एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सन 2019 मध्ये अजित पवार यांच्या सहमतीने डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. अजितदादांनी आम्हाला आधी भाजपात पाठवलं नंतर ते स्वतः भाजपसोबत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन अजित पवार यांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण आहे, असे मल्हार पाटील या सभेत म्हणाले.

दरम्यान, धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तिकीट दिले. यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारात अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. गावागावात दौरे सुरू केले आहेत. प्रचारसभांनी वातावरण ढवळून निघाले आहे.

प्रचारसभांच्या माध्यमातून मल्हार पाटील विरोधकांवर तुटून पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ, देशात भाजप सरकारच्या नेतृत्वात झालेली कामे मतदारांसमोर ठेवत आहेत. याच प्रचारातील एका सभेत त्यांनी अजित पवार यांच्याच सहमतीने आम्ही भाजपात प्रवेश केल्याचे मल्हार पाटील  यांनी सांगितले. त्यांच्या या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पक्षप्रवेश करताच अर्चना पाटलांना धाराशिवची उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांना देणार ‘फाईट’

 

follow us