Manoj Jarange vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही एकेरी उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील यांनी आज बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवारांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत अजित पवारांवर टीका केली.
शेवटी त्यांनी पोटातले ओठावर आणलेच. आधीपासूनच मराठ्यांच्या विरोधात काम केलं. दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी कोट्यावधी मराठा समाजाचे वोटोळे केले. आता शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करूनच दाखवावी मग मराठे सुद्धा शांततेत उत्तर देतील, असे जरांगे पाटील म्हणाले. अजित पवार यांना नोंदी सापडलेल्या माहिती नाही का? ते महाराष्ट्रातच राहतात का असे सवाल करत राज्यात 54 लाख नोंदी सापडल्याचे मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्र्यांने सांगितल्याचे जरांगे म्हणाले.
Lok Sabhha : जेवढ्या शिंदेंना तेवढ्याच जागा आम्हाला हव्यात! अजित पवार गटाने मांडली रोखठोक भूमिका
मराठा समाज आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका. तुम्हाला जर बोलायचं असेल तर मराठ्यांच्या बाजूने बोला. नाहीतर आतापर्यंत जसे गप्प बसून होतात तसेच गप्प राहा. तुम्ही आधीपासून हेच केले. पहिल्यापासूनच मराठ्यांच्या मुळावर उठलात. ज्यावेळी तुम्ही मौन धारण केले त्यावेळी असे वाटले होते की तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहात. पण, शेवटी पोटात जे होते ते ओठावर आलेच. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणारच आहोत. कारावाई केली तर मराठा समाजही शांततेत उत्तर देईल. अजित पवार अपघाताने सरकारमध्ये आले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार ?
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. धनगर समाज आरक्षण मागतोय. आदिवासी म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. जे मागास आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचे आहे, असे अजित पवार म्हणाले होते.
काही जणांचं वय 84 झालं तरी थांबेना, अरे थांबा ना! अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार