‘काही जणांचं वय 84 झालं तरी थांबेना, अरे थांबा ना!’ अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार

‘काही जणांचं वय 84 झालं तरी थांबेना, अरे थांबा ना!’ अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार

Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कल्याण येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. तर दुसरीकडे शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्या वयाचा उल्लेख करत राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला.

Ajit Pawar : कशाला खपल्या उकरून काढता? आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावर अजितदादांचं मोजकचं उत्तर

कायदा हातात घेऊ नका, मनोज जरांगेंना इशारा 

अजित पवार पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. धनगर समाज आरक्षण मागतोय. आदिवासी म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. जे मागास आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

मोदींसारखे दुसरे नेतृत्व नाही 

ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या मोठी आहे. रस्त्यांचीही समस्या आहे. कचरा विल्हेवाट लावण्याची ताकद गावांमध्ये नाही. यासाठी राज्य आणि केंद्राची साथ लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत अनेकवेळा होता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत गेलं पाहिजे. आज पंतप्रधान मोदींसारखं दुसरे नेतृत्व नाही. मागील नऊ वर्षांत त्यांनी मोठे काम केले. वाहतुकीला गती देण्याचे काम केले. चांद्रयानाचे सगळ्यांनी कौतुक केले. 80 कोटी लोकांना मोफत धान्य सरकार देत आहेत. घरे देण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांना सहा हजार आणि आम्ही सहा हजारांची भर टाकली. बारा हजार त्यांच्या खात्यात जमा होत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो’; शड्डू ठोकल्यानंतर दादांचं आव्हान 

मेलो तरी चालेल पण, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत 

आमची विचारधारा वेगळी होती तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना होता. त्यावेळीही मी सकाळी 8 वाजताच मंत्रालयात जाऊन बसायचो. काही जण म्हणायचे कोरोना आहे. मी म्हणायचो मेलो तरी चालेल पण लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. त्यामुळे आता कोण काय चर्चा करतोय याला जास्त महत्व देत नाही. विकासाला महत्व देतो, असे अजित पवार म्हणाले.

ठाणे जिल्हा राष्ट्रवादीमय करायचाच 

मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ठाण्यातील गुंडगिरी मोडून काढा. पोलिसांनी सामान्यांच रक्षण करा. वेडेवाकडे धंदे आजिबात चालणार नाहीत. चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका. चुकला तर कुणीही असो त्याला पाठिशी घालू नका. शिस्तीत कामकाज करा. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तेव्हा आता बूथ कमिट्या तयार करा. वेळ वाया घालवू नका. कारण आपल्याला जास्तीत खासदार निवडून आणायचे आहेत. राष्ट्रवादीची ताकद काय आहे हे दाखवून द्यायचे आहे. ठाणे जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube