Download App

Maratha Reservation : आंदोलक आक्रमक! आमदारांच्या निवासासहीत सरकारी कार्यालयही सोडले नाही

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. राजकीय नेत्यांना अडवून त्यांना जाब विचारला जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती चिघळली. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. काही तासांपूर्वी माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेच्या (MLA Pradeep Solanke) घराला आग लावल्यानंतर आता भाजप आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले?

मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत देऊनही मराठा आरक्षण न मिळाल्यानं त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. तर काही आंदोलकांनी बंगल्याच्या पार्किंगला आग लावली. या आगीत बंगल्यासह सोळंके यांची गाडीही जळून खाक झाली. या घटनेचा व्हिडिओही समोर आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

माजलगाव नगरपरिषदेला लावली आग
अशाचतच आता बीडच्या नगर परिषदेमध्येही जाळपोळ करण्यात आली. आरक्षणाची मागणी करणाऱ्या जमावाने माजलगाव नगरपरिषदेत घुसून जाळपोळ केली. अशा स्थितीत नगर परिषदेच्या इमारतीला भीषण आग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यामुळं सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे.

आमदार बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड
आता या हिंसक आंदोलनाचे लोन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पोहोचले. गंगापूर शहरातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची मराठा आंदोलकांनी तोडफोड केली आहे. यावेळी कार्यालयातील सर्व सामानाची नासधूस करण्यात आली आहे. अचानक आलेल्या मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या, खुर्च्याही फोडल्या.

तहसीलदारांची गाडी पेटवली
जालन्यात महिला तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये अज्ञातांनी तहसीलदारांची गाडी पेटवून दिली आहे.

आंदोलकांकडून बसेसची तोडफोड
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात विविध जिल्ह्यांमध्ये 12 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात 6 बसेसवर दगडफेक करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात 144 एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. धाराशिवप्रमाणेच जालना जिल्ह्यातही एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. यामुळं सुमारे 25 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी टायर जाळून निषेध
मराठा आरक्षणाच्या मागमीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाना आता उग्ररूप धारण केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून धाराशिव येथील शिंगोली सर्किट हाऊसजवळ सोलापूर-धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून येत्या दोन दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आणखी तीव्र व हिंसक आंदोलन करण्याचा इशारा समाजातील लोकांनी दिला आहे.

 

follow us