Dhananjay Munde Resignation : मस्साजागचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्र सुन्न झाला. या प्रकरणी सीआयडीने दोन दिवसांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात वाल्मिक कराडचा आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर काल संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो समोर आले. अतिशय निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आले. घटनेचे फोटो पाहून राज्यातच संतापाची लाट उसळली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे.
यानंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत गेला. अखेर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर आता धनंजय मुंडेंच्या जागी कुणाला मंत्री करायचं अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत राष्ट्रवादीतील दोन ज्येष्ठ आमदारांची नावे समोर आली आहेत. जहां नहीं चैना वहां नही रहना, असे म्हणणाऱ्या नाराज छगन भुजबळांचे पुनर्वसन होणार की बीड जिल्ह्यातील माजलगावचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांना संधी मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारला असता, रोहित पवार भडकले
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीमाना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे आता मंत्रिपदाच्या कारभारातून बाजूला झाले आहेत. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार होता. आता या खात्याचा मंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. खातेवाटपात पुरवठा खाते अजित पवार गटाच्या वाट्याला आले होते.
या खात्याचा कारभार अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना दिला होता. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं होतं. यात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं होतं. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात होता. तरी देखील मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध झाला. येथे मात्र सरकारने माघार घेतली. धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिलं नाही. अजित पवार यांनी स्वतः बीड जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली होती.
परंतु, आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्याच एखाद्या आमदाराची वर्णी लागणार हे निश्चित आहे. पण हा आमदार कोण असेल अशी चर्चा सुरू असतानाच दोन नावे समोर आली आहेत. छगन भुजबळ आणि प्रकाश सोळंके यांच्या नावांची सध्या चर्चा आहे.
..तर नैतिक अनैतिकची व्याख्या सरकारलाच, छगन भुजबळ मुंडेच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?
राज्य मंत्रिमंडळात डावलले गेल्याने छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली होती. भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, असे काही घडले नाही. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर थोड्या वेळासाठी का होईना पण शिर्डीतील अधिवेशनाला भुजबळांनी हजेरी लावली होती. आता त्यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.