प्रस्तावित जळगाव ते छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) सहापदरी शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या उभारणीत महत्त्वाची प्रगती झाली असून, प्राथमिक सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महामार्गाची सुरुवात जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार लवकरच अधिसूचना प्रसिद्ध होऊन जमीन संपादन आणि निविदा प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी सुमारे १०५ किलोमीटर असेल. धरणगाव तालुक्यातील टहाकळी गावाजवळून सुरू होणारा हा महामार्ग पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौका परिसरात नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. या मार्गामुळे खान्देश आणि मराठवाडा विभागांमधील दळणवळण अधिक सुलभ होईल. औद्योगिक, कृषी आणि व्यावसायिक विकासाला नवी चालना मिळू शकेल. सध्या जळगावहून छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी अजिंठा किंवा कन्नड घाटातून जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो.
मराठी, शेतकरी कर्जमाफी अन् शक्तीपीठ, विरोधकांचा अजेंडा ठरला; दानवेंचं फडणवीसांना पत्र
या प्रवासासाठी साधारण दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. मात्र, प्रस्तावित द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर अवघ्या एका तासात पार करता येणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी झाल्यामुळे जळगावहून मुंबई किंवा नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवासही अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. मुंबईपर्यंतचा प्रवास सुमारे चार तासांत पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्रस्तावित जळगाव ते छत्रपती संभाजीनगर शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग धरणगाव, एरंडोल, जळगाव आणि पाचोरा या तालुक्यांतील अनेक गावांमधून जाणार आहे. ज्यामध्ये धरणगाव तालुक्यातील टहाकळी, पाळधी बुद्रुक आणि पाळधी खुर्द तसेच एरंडोल तालुक्यात सावदे प्र. चां., पिंपळकोठे प्र. चां., खेडी खुर्द, रवंजे खुर्द, रवंजे बुद्रूक आणि दापोरी या गावांचा समावेश आहे. जळगाव तालुक्यातील लमांजन, कुऱ्हाडदे, वाकडी, म्हसावद, बोरनार, डोमगाव आणि पाथरी या गावांनाही या प्रकल्पाचा स्पर्श होणार आहे. तर पाचोरा तालुक्यातील सामनेर, लासगाव, आसनखेडे खुर्द, नांद्रा, पहाण, मोहाडी, नाईकनगर, सांगवी प्र. लोहारे, साजगाव, लोहारी बुद्रूक, वरखेडी बुद्रूक, लासुरे, वाणेगाव, राजुरी बुद्रूक, वाडी, शिंदाड आणि गहुले या गावांमधून महामार्गाचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करावी लागणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जमीन मोजणी, मूल्यांकन आणि मोबदला निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रशासनाकडून जमीन मालकांशी समन्वय साधून संपादन प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान करण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.
नवीन शिघ्रसंचार महामार्गामुळे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होईल. तसेच पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीसाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. खान्देश आणि मराठवाडा या दोन प्रमुख विभागांना जोडणारा हा द्रुतगती महामार्ग प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी नवा मैलाचा दगड ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
असा जाईल द्रुतगती महामार्ग
धरणगाव तालुका- टहाकळी, पाळधी बुद्रुक, पाळधी खुर्द
एरंडोल तालुका- सावदे प्र. चां., पिंपळकोठे प्र.चां., खेडी खुर्द, रवंजे खुर्द, रवंजे बुद्रूक, दापोरी
जळगाव तालुका- लमांजन, कुऱ्हाडदे, वाकडी, म्हसावद, बोरनार, डोमगाव, पाथरी
पाचोरा तालुका- सामनेर, लासगाव, आसनखेडे खुर्द, नांद्रा, पहाण, मोहाडी, नाईकनगर, सांगवी प्र. लोहारे, साजगाव, लोहारी बुद्रूक, वरखेडी बुद्रूक, लासुरे, वाणेगाव, राजुरी बुद्रूक, वाडी, शिंदाड, गहुले.
