Chandrakant Khaire: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ आणि सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलतांना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही वादग्रस्त विधान केलं.
रविवारी शहरातील क्रांती चौकात सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत क्रांती चौक परिसर दणाणून सोडला. दरम्यान, पत्रकारांशी बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले, कोणत्याही गावात कोणताही पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असो की मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असो. त्या पुतळ्यांंची विटंबना केली किंवा वेगवेगळ्या संदेश रुपाने काही केलं तर दंगली होतात. आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? दंगली झाल्या पाहिजेत, अशी मुक्ताफळे खैरेंनी उधळली.
प्रदेशाध्यक्ष रिपून बोरांनी सोडली ममता बॅनर्जींची साथ, कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार?
ते म्हणाले, आज आम्ही महाविकास आघाडी मिळून जोडे मारो आंदोलन करत आहोत, परवानगी मिळालेली नसतानाही जोडे मारो आंदोलन करत आहोत. पोलिस येऊ द्यात आता 40 वर्षात आम्हाला सवय झाली.
खैरे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होते, मोठमोठे नेते दंगलीची भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय, राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जमातींमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न लोकसभेपूर्वीही झाला. मात्र, राज्यातील जनता सुज्ञ आणि संयमी आहे. म्हणून राज्य सरकार देखील कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले.