एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी (MIM) सध्या अजित पवारांवर जोरदार घणाघात सुरू केला आहे. अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे, त्यांच्या पक्षाला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन अशा शब्दात थेट वार केले आहेत. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोलापुरात एमआयएमच्या उमेदवारांसाठी आयोजीत प्रचार सभेत ते बोलत होते.
एमआयएमचे माजी शहराध्यक्ष आणि आताचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तौफिक शेख यांच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली. सोलापूरला आपण पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथं इतक्या वर्षांपासून आहेत, काहीच करत नाही. पाकिस्तानच्या घटनेत लिहलंय की एकाच धर्माचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस बघण्यासाठी कदाचित मी जिवंत नसेन, पण हा दिवस एक ना एक दिवस नक्की येईल असंही ते म्हणाले.
अजित पवार आणि महायुतीवर टीका करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ‘देशाच्या संसदेत बोलणारा मी आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदीच्या गोदीत बसलेत. अजित पवारांना व्होट म्हणजे मोदींना मत. अजित पवारला व्होट म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काही घेणे-देणे नाही, पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही त्रिमूर्ती ही एकच आहेत. ते तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, त्यांना मटपेटीतून उत्तर द्यावा लागेलं.
Pune Politics : अजित पवारांना घेरता घेरता, दादांनी लावला भाजपचेच मोहरे पळवण्याचा सपाटा
एमआयएम गरिबांमुळे सुरू झाली, त्यामुळे गरिबांसाठी काम करते. कोणी तरी म्हटलं की माझ्या शेरवानीला हात लावणार. तुमचा जो राजकीय बाप आहे अजित पवार, त्याला समोर बसा म्हणा. तीन मिनिटात त्याला मुका (गुंगा) नाही केलं तर सांगा अशा शब्दात ओवैसींनी अजित पवारांना आव्हान दिलं. असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “या नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी तुम्हीच एमआयएमला संजिवनी दिली होती . आज एमआयएमला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती करण्यासाठी मी आलो आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार, शिंदेचे लोक या नई जिंदगी परिसराला बदनाम करण्याचे प्रयत्न करतात. त्यांना सगळ्यांना सांगणं आहे, हा परिसर असदुद्दीन ओवैसीचा आवडता आहे, हा परिसर सोलापूरचे हृदय आहे. जर तुम्ही या परिसराबद्दल काही चुकीचं बोललात तर मी तुमच्या बापाबद्दल बोलायला सुरु करेन.
तुम्ही एमआयएमच्या चार उमेदवार इथून निवडून द्या. इथं 16 इंच पाण्याची पाईपलाईन सुविधा देऊ. शुगर फॅक्टरीच्या रस्त्याचे काम इथं पेंडिंग आहे, ते देखील नगरसेवक पूर्ण करतील. या परिसरात एक चार नगरसेवक मिळून एक अॅम्ब्युलन्स सुरू करतील. इथे प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, नोटरीवर जागा खरेदी केली जाते. मी तुम्हाला आश्वासन देतो, इम्तियाज जलील स्वतः येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. जर प्रशासनाने हे केलं नाही तर त्यांना जनआंदोलनाला सामोरं जावं लागेल. इथल्या नागरिकांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत लागतील, विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडं लक्ष द्यावा लागेल. पैसा, भाषणाने कोणी ताकदवान होत नाही, चांगली वागणूक महत्त्वाची आहे.
ते फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल. आज 9 जानेवारी आहे, याच दिवशी फातिमा शेख यांचा जन्म झाला होता. फातिमा शेख या त्याच आहेत ज्यांनी सावित्रीबाई यांना आपलं घर देऊन लायब्ररी सुरु केली होती. त्यावेळी मनुवादी लोक दलितांना शिकू देत नव्हते . पण फातिमा दलितांच्या घरी घरी जाऊन फुले दाम्पत्याने शाळा सुरु केली तुम्ही शाळेत या असं सांगायच्या. आज नई जिंदगी परिसरात देखील अशाच पद्धतीने मुलांना शिकवावं लागेल. आमच्या युवा कार्यकर्त्याने इस्त्रायलचा निषेध केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. बहुतेक FIR दाखल करणारा नेत्यानाहूचा पुतण्या असेल, त्याचा नाव नेत्यानाहूचा पुतण्या म्हणूनच ओळखलं जाईल अशी टीका ओवैसी यांनी केली.
