Sangram Jagtap : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेने संतप्त झालेल्या हिंदू समाजाच्या रास्ता रोको आंदोलनाला आता राजकीय संघर्षाचे स्वरूप आले आहे. चिंचोली काळदात फाटा येथे झालेल्या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याच्या आरोपावरून आमदार संग्राम जगताप यांच्यासह १८ जण आणि तब्बल १०० ते १५० अनोळखी आंदोलकांविरुद्ध मिरजगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस प्रशासनावरच निशाणा साधत आक्रमक भूमिका घेतली. गुन्हे दाखल करून आमचे कार्य थांबेल, असे प्रशासनाने समजू नये असा थेट इशारा जगताप यांनी दिला.
चिंचोली काळदात येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी हिंदू समाजाच्या वतीने चिंचोली काळदात फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी सुमारे ११ वाजता ॲड. आकाश हाळनवर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र आले. पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा हवाला देत आंदोलन न करण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरूच ठेवल्याने श्रीगोंदा-जामखेड महामार्ग आणि कर्जत-मिरजगाव मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि धवलसिंह मोहिते यांची उपस्थिती होती. दोघांनीही आंदोलनात सहभागी होत भाषणे केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
आधी विटंबना करणाऱ्यावर कारवाई का नाही; जगतापांचा पोलिसांना सवाल
गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई झाली नाही. उलट महाराजांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरलेल्या मावळ्यांवर कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आले,असा आरोप जगताप यांनी केला.आंदोलन होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आणि आंदोलनाच्या आदल्या दिवशी अटक करण्यात आली, असा दावा त्यांनी केला.आंदोलनाची वेळ आली म्हणून कारवाई करण्याची भूमिका का घेतली? आधीच कारवाई का झाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलिस ठराविक लोकांना टार्गेट करत आहेत
स्थानिक पोलिस प्रशासनावर थेट आरोप करत जगताप म्हणाले की, पोलिसांनी ठराविक लोकांना टार्गेट करण्याची भूमिका घेऊ नये. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. आंदोलनात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य झालेले नाही.धीरज परदेशी प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घटनांमध्ये पोलिस प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; पोलिसांच्या भूमिकेचा अहवाल देणार
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चिंचोली काळदातसह राज्यात घडणाऱ्या घटनांची आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेची माहिती देणार आहे,असे त्यांनी सांगितले.हिंदू समाजाच्या सुरक्षिततेचा मुद्दाही जगताप यांनी उपस्थित केला. वारंवार घडणाऱ्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही
रास्ता रोकोप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही आपली भूमिका कायम असल्याचे स्पष्ट करत जगताप यांनी प्रशासनाला इशारा दिला. गुन्हे दाखल करून हे कार्य थांबेल, असे कोणालाही वाटत असेल तर ते चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी सुरू केलेले कार्य सुरूच राहील अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.त्यांच्या या वक्तव्यामुळे चिंचोली काळदात येथील विटंबना प्रकरणाला आता कायदा-सुव्यवस्था, पोलिसांची कारवाई आणि राजकीय संघर्ष असे तीनही आयाम मिळाले आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणावरून कर्जत तालुक्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्ष, चिन्हावर ठाकरेंचा दावा; सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
मिरजगाव पोलिसांनी ॲड. आकाश हाळनवर, शुभम माने, चंदनसिंग परदेशी, नितीन तोरडमल, वैभव काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठलसिंह शेडगे, रघुआबा काळदाते, धनंजय बांदल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगुडे, बालाजी लाळगे, सुनील यादव, ऋषीकेश काळदाते यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
