Nilesh Lanke On Ahilyanagar Election : राज्यातील राजकारणात सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यातच अहिल्यानगरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट महायुती मधून बाहेर पडले आहे. शिवसेना (Shivsena) अहिल्यानगर महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला देखील मोठा धक्का लागला आहे. दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला अहिल्यानगरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
तर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून कुठलाही गोंधळ होणार नाही. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया अहिल्यनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिली आहे. तसेच कार्यकर्त्याला जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून नेत्यांची धावपळ सुरू असते त्यामुळे जागावाटपावरून काही वाद निर्माण होतात मात्र महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कुठलाही वाद नाही. तिन्ही पक्ष एकमत असून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे असं देखील निलेश लंके म्हणाले.
मोठी बातमी, मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार असून आम्ही या निवडणुकीत निस्वार्थ निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार आहोत. विक्रम राठोड यांच्यावर काही अन्याय झाला नाही. ते शिवसेनेसोबत जागावाटपाची चर्चा करताना माझ्यासोबत होते मात्र आता काय झालं असेल तर मला माहिती नाही. राजकारण क्षणाक्षणात बदलत असते. महायुतीमध्ये बिघाड झाल्यानंतर महाविकास आघाडीला फायदा होणार असल्याचे मत देखील खासदार लंके यांनी व्यक्त केले.
शिवसेना ठाकरे गटामध्ये सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची खंत व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला असल्याची माहिती विक्रम राठोड यांनी दिली होती. तसेच शिवसेना ठाकरे गटाची विचारधारा आता बदलली आहे असा आरोप देखील विक्रम राठोड यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेना शिंदे गट महायुतीमधून बाहेर पडल्याने आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
