Nana Patole :
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून राज्यात काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात वातावरण तापताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत अशा नेत्यांशी पटोले यांचे संबंध फारसे चांगले नसल्याच बोललं जात आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी तर उघडपणे पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. तसंच त्यांना हटविण्याची मागणी केली होती. (Congress state president Nana Patole’s supporters went to Delhi and met Congress president Mallikarjun Kharge.)
नुकतचं सुनील केदार, विजय वडेट्टीवर आणि शिवाजीराव मोघे या नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली होती. या भेटीतही पटोले यांच्याबद्दल चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनीही दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली होती. त्यामुळे नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची धोक्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
अशात आता पटोले यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम ठेवावे अशी मागणी करत त्यांच्या समर्थकांनी दिल्लीतून फिल्डिंग लावली आहे. गुरुवारी (8 जून) पटोले समर्थकांनी थेट दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. सुमारे 30 मिनिटांच्या चर्चेत पटोले समर्थकांनी खर्गे यांना राज्यात सुरु असलेल्या संघटनेच्या कामाची माहिती दिली.
याशिवाय राज्यात काँग्रेसमध्ये निर्माण होत असलेल्या गटबाजीचीही माहिती दिली. सोबतच पटोले यांच्या नेतृत्वाखालीच पुढील निवडणुकीची तयारी करावी, पक्षाचे प्रदेश प्रभारी एच. पाटील यांचा कर्नाटक मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाटील यांच्या जागी असे प्रभारी नेमावेत, जे संघटनात्मक कामात समन्वय ठेवून काम करतील, अशी विनंती करण्यात आली.
दरम्यान, चर्चेला गेलेल्या नेत्यांमध्ये आमदार धीरज लिंगाडे, विकास ठाकरे, प्रदेश सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, औद्योगिक व्यापारी सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, नाना गावंडे, संजय राठोड, उमेश डांगे, श्याम उमाळकर, संजय महाकाळकर, प्रशांत धावड, उदय सिंह, डॉ. यादव, अनीस अहमद, आकाश जाधव, तेजेंद्र चव्हाण, किशोर बोरकर यांचा समावेश होता.