Download App

अजितदादा, तुमची पुण्यात येऊन वाजवीन; चिडलेल्या राणेंचा सज्जड इशारा

Narayan Rane : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेली टीका राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अजित पवार हे ज्या प्रकारचे राजकारणी आहेत त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचे बारसे करायला त्यांनी जाऊ नये. त्यांनी माझ्या फंदात आजिबात पडू नये, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवीन अशा शब्दांत राणे यांनी अजित पवार सज्जड इशारा दिला आहे. मंत्री राणे हे शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता राणे म्हणाले, की अजित दादांना बारामतीच्या बाहेर कितपत कळते हे मला माहिती नाही. ज्या प्रकारचे ते राजकारणी आहेत त्याबद्दल बोलू नये असे मला वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून मी कोकणातून निवडणूक लढलो आणि सलग सहा वेळा निवडूनही आलो. त्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून बांद्रा मतदारंसघातूनही निवडणूक लढली होती. उमेदवार हा शेवटी उमेदवार असतो त्यात पुरुष काय किंवा महिला काय असा प्रश्न त्यांनी केला.

हे वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची नारायण राणेंना मंत्रिपद काढून घेण्याची धमकी

याआधी अजित पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीतील प्रचारसभेत शिवसेना फोडणारे नेते कधीच यशस्वी झाले नाहीत. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर तर भाजपचे केंद्रीय मंत्री राणे दोनवेळा पडले. एकदा कोकणातून तर दुसऱ्या वेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणेंना पाडलं, असे पवार म्हणाले होते. त्यानंतर पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री राणे यांनी प्रसारमाध्यमांना संतप्त प्रतिक्रिया दिली. यानंतर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us