पंतप्रधान नरेंद्र मोदींची नारायण राणेंना मंत्रिपद काढून घेण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नारायण राणेंना मंत्रिपद काढून घेण्याची धमकी

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातला आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. यावरुन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

या कारणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फैलावर घेत त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची धमकी दिली होती. अशी माहिती मंगळवारी खासदार विनायक राऊत यांनी दिली. ते कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

राऊत म्हणाले की, राणेंच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला आहे. हे कारनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेले. त्यामुळे त्यांनी राणेंना चांगले फैलावर घेत या सचिवाला काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा तुमचे मंत्रिपद काढू, असा इशारा त्यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला.

विनायक राऊत पुढे म्हणाले की, केरळच्या एका खासदाराने लोकसभेत इंग्रजीत विचारलेला एक प्रश्नही राणे यांना समजला नव्हता. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले होते. राणेंनी कानाला हेडफोन लावलेला. त्याचे हिंदीत भाषांतरही झाले. त्यामुळे त्यांना हा प्रश्नच समजला नाही. त्यांनी त्यावेळी असेच थातूर-मातूर उत्तर देऊन प्रश्न निकाली काढला. तेव्हापासून ते सभागृहात गेलेच नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

राऊत पुढे म्हणाले की, त्यांना हिंदी सोडा धड मराठीच काय मालवणीही बोलता येत नाही. त्यांना फडणवीस या शब्दाचा स्पष्ट उच्चार करता येत नाही. त्यांच्या लोकसभेच्या कार्यकाळात ते एकदाही प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले नाहीत, असा दावा त्यांनी केला. शिवाय त्यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना ‘एमएसएमई’चा फुल फॉर्म सांगावा तरी असा चिमटा काढला.

विनायक राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गट आज ना उद्या भाजपमध्ये विसर्जित होईल. भाजपने सत्तारांना आडवे केले. उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचे पुरावेही त्यांनीच मीडियाला दिले. आता सामंत यांनी ठाकरे गटाच्या कोणालाही त्रास दिला, तर त्यांचा डांबर आणि बांधकाम क्षेत्रातला घोटाळा बाहेर काढू, असा इशारा त्यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube