हॉर्मोनल लोचा की, भावनिक कोंडी? खरातच्या ओशनो जल अन् पेढ्यामुळे महिलांचे देहभान का हरपायचे?

Ashok Kharat ने स्वतःला 'कृष्णाचा अवतार' भासवून आणि महिलांना 'पूर्वजन्मीची राधा' असल्याचे सांगून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

हॉर्मोनल लोचा की, भावनिक कोंडी? खरातच्या ओशने जल अन् पेढ्यामुळे महिलांचे देहभान का हरपायचे?

हॉर्मोनल लोचा की, भावनिक कोंडी? खरातच्या ओशने जल अन् पेढ्यामुळे महिलांचे देहभान का हरपायचे?

Ashok Kharat Case & Psychological Process Of Surrender : विज्ञानाच्या युगातही मानवी मनाच्या अगतिकतेचा फायदा कसा घेतला जातो, याचे विदारक उदाहरण नाशिकमध्ये समोर आले आहे. अशोक खरात नावाच्या एका सामान्य व्यक्तीमध्ये ‘देवीचा अवतार’ शोधत काही महिलांनी आपले आयुष्य त्याच्या चरणी समर्पित केले. मात्र, ज्याला ‘देव’ मानले गेले, तो प्रत्यक्षात एक मनोवैज्ञानिक अभ्यासक असल्याचे उघड झाले आहे. हा केवळ एका शहराचा प्रश्न नसून, श्रद्धेच्या नावाखाली महिलांच्या मानसिकतेशी खेळण्याचे हे एक जागतिक ‘सायकोलॉजिकल ट्रॅप’ आहे. या टोकाच्या समर्पणामागे नेमकी कोणती मानसिक कारणे आहेत आणि हा भ्रमाचा खेळ कसा चालतो, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Ashok Kharat : अचाट शक्तिवर्धक अन् कामोत्तेजक; तुर्कितील एल्विश मध कसा तयार होतो?

ओशने जल मग पेढा अन् अत्याचार

अशोक खरात याने स्वतःला ‘कृष्णाचा अवतार’ भासवून आणि महिलांना ‘पूर्वजन्मीची राधा’ असल्याचे सांगून त्यांचे पद्धतशीरपणे लैंगिक शोषण केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. खरात सुरुवातीला महिलांच्या समस्या ऐकून घ्यायचा. त्यानंतर “तुझ्यावर करणी झाली आहे”, “तुझ्यावर मोठे संकट येणार आहे” किंवा “तुझ्या मुलाचे नुकसान होईल”, अशी भीती घालून त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करायचा. संमोहन आणि संवादाच्या जोरावर तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. तसेच पीडित महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावून तो त्यांचा चुकीचा स्पर्श करायचा. एवढेच नव्हे तर, एकदा महिलेचा विश्वास संपादित केला की, तो महिलांना ‘ओशनो जल’ या तीर्थाच्या नावाखाली एक विशिष्ट खारट आणि कडवट चवीचे पाणी प्यायला द्यायचा. पाण्यासोबतच तो महिलांना प्रसाद म्हणून पेढा खायला द्यायचा.

हे पदार्थ खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ होणे, डोके गरगरणे किंवा डोके जड होणे असे त्रास व्हायचे. यामुळे महिला पूर्णपणे खरातच्या इशाऱ्यावर चालू लागायच्या. एकदा महिला गुंगीच्या अवस्थेत असताना खरात केबिनमधील लाईट बंद करून त्यांच्यावर अत्याचार करायचा. अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्ड करून तो महिलांना ब्लॅकमेल करायचा, जेणेकरून त्या कोणाकडे तक्रार करणार नाहीत. तर काही पीडितांनी पेढा आणि ओशने जल पिल्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलं हे आठवतं नसल्याचे सांगितले आहे. खरातने अद्याप तो वापरत असलेल्या औषधांबाबत किंवा द्रव्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. महिलांना गुंगी आणणाऱ्या पेढ्यात आणि द्रवात कोणते घटक होते, याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे.

हळदीवेळी शर्ट काढायला भोंदू खरातने दिला होता नकार, खरातच्या सासुरवाडीतून हादरवणारा खुलासा

दैवी शक्ती नव्हे, तर मनाचा खेळ

आता हे झालं खरात महिलांना कसा आकर्षित करायचा त्याबद्दल पण, महिलांना एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणारी ‘दैवी शक्ती’ ही प्रत्यक्षात कोणतीही अलौकिक ऊर्जा नसून, तो केवळ एक मानसोपाचारविषयक भ्रम (Psychological Delusion) असतो. हार्मोनल बदल, तीव्र भावनिक ताण आणि भूतकाळातील कटू अनुभव यांमुळे मनाची अवस्था विचलित होते. विशेषतः मासिक पाळीदरम्यानचा शारीरिक ताण किंवा कौटुंबिक समस्यांमुळे आलेल्या अगतिकतेतून अशा ‘शक्ती’ भासू लागतात. एकटेपणा, नातेसंबंधातील तणाव किंवा सततचा मानसिक दबाव यांपासून सुटका मिळवण्यासाठी स्त्रिया नकळत अशा श्रद्धेचा आधार घेतात. हा भ्रम त्यांना काही काळ मानसिक बळ देत असला, तरी प्रत्यक्षात ही एक मोठी भावनिक फसवणूक असते, ज्याचा फायदा भोंदू प्रवृत्तींकडून घेतला जातो.

‘सायकोलॉजिकल ट्रॅप’: वाचन नसलेली स्त्री सहज भ्रमात का फसते?

बहुतांश महिलांना वाचनाची सवय नसते. वर्तमानपत्रे, पुस्तके किंवा नवीन ज्ञान यांच्यापासून त्या दूर असतात. यामुळे त्यांना असामान्य भावना येताच देवीची शक्ती वाटते.‘वाचन नसलेली स्त्री सहज भ्रमात फसते.’, असे मानोवैज्ञानिक सांगतात. हा अनुभव दैवी आहे असे त्यांना वाटते पण वास्तवात ती त्यांच्या मनातील कल्पना असते. अशा महिलांना समोरचा साधा माणूसही देवासारखा वाटतो. यामुळे त्या त्याच्याकडे आकर्षित होतात. समाजात अजूनही अनेक स्त्रिया अशा आहेत ज्यांना शाळा-कॉलेजचे शिक्षण मिळाले तरी घरगुती कामात व्यस्त राहून ज्ञान वाढवत नाहीत. त्यामुळे त्यांची निर्णयक्षमता कमकुवत होते. Ashok Kharat Case & Psychological Process Of Surrender

शिक्षणापेक्षा ‘जाणीव’ महत्त्वाची आहे. अनेक महिला घरगुती कामात इतक्या व्यस्त असतात की, त्यांचा जगाशी आणि वाचनाशी संपर्क तुटतो. ज्ञान नसेल तर समोरचा साधा माणूसही देवासारखा भासू लागतो आणि तुमची निर्णयक्षमता संपते. जेव्हा मनाची अवस्था विचलित होते किंवा एखादी असामान्य भावना मनात येते, तेव्हा ज्ञानाच्या अभावामुळे तिला थेट ‘दैवी शक्ती’ समजले जाते. वाचन नसलेली स्त्री सहज भ्रमात फसते, हे कटू सत्य आहे.

आज शाळा किंवा कॉलेजमध्ये औपचारिक शिक्षण मिळाले असूनही, अनेक स्त्रिया घरगुती जबाबदाऱ्यांत इतक्या गुंतल्या आहेत की, त्यांचे अद्ययावत ज्ञान वाढणे थांबले आहे. यामुळे त्यांची तार्किक विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. परिणामी, समोरचा एखादा साधा माणूसही त्यांना ‘तारणहार’ किंवा ‘देवाचा अवतार’ वाटू लागतो आणि त्या सहजपणे अशा भोंदूंच्या मोहजालात किंवा आकर्षणात अडकतात.

अंकशास्त्राचा गप्पा मारणारा कॅप्टन गणितातच ढ; दहावीच्या रिझल्टनं काढली अशोक खरातची कुंडली 

समर्पणाची घातक मानसिक प्रक्रिया कशी सुरू होते?

समर्पण ही एक अत्यंत नाजूक आणि टप्प्याटप्प्याने घडणारी मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. याची सुरुवात होते ती समोरच्या व्यक्तीच्या गोड बोलण्याने आणि सहानुभूतीने. जेव्हा एखादी स्त्री आपल्या मनातील गुपिते किंवा समस्या एखाद्या ‘गुरू’ मानलेल्या व्यक्तीसमोर मांडते, तेव्हा तो भोंदू तिला ‘तुझ्यामध्ये दैवी शक्ती आहे’ असे सांगून तिच्या सुप्त अहंकाराल किंवा कमकुवत मनाला कुरवाळतो. यामुळे त्या स्त्रीला तात्पुरता खोटा आत्मविश्वास मिळतो आणि ती आपले सर्व निर्णय त्या व्यक्तीवर सोपवू लागते. या प्रक्रियेत ‘गुरूची कृपा’ किंवा ‘देवीची इच्छा’ यांसारख्या आध्यात्मिक शब्दांचा वापर करून तिच्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेवर घाला घातला जातो. हळूहळू, हा विश्वास इतका टोकाचा होतो की, ती स्त्री स्वतःचे अस्तित्व विसरून त्या व्यक्तीच्या मानसिक गुलामीत अडकते, ज्याला समाजात चुकीच्या पद्धतीने ‘पूर्ण समर्पण’ म्हटले जाते.

जाळ्यात अडकवण्याची भोंदूंची पद्धत

भोंदूगिरीचा बाजार मांडणाऱ्या व्यक्ती महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करतात. याची सुरुवात होते ती महिलांच्या मानसिक आणि कौटुंबिक कमकुवतपणाच्या ओळखीने. घरातील एकटेपणा, सततची भांडणे किंवा आर्थिक अडचणींमुळे अस्वस्थ असलेल्या महिलांना हे लोक प्रथम आपले लक्ष्य बनवतात. सुरुवातीला अत्यंत गोड बोलून आणि सहानुभूती दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला जातो. ‘तुमच्यात विशेष दैवी शक्ती आहे’ किंवा ‘तुम्ही साक्षात देवीचे रूप आहात’ असे भासवून त्यांच्या मनात स्वतःबद्दल एक खोटा विशेषभाव निर्माण केला जातो.

एकदा का हा विश्वास घट्ट झाला की, त्या महिलेची स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू क्षीण होत जाते. ती पूर्णपणे त्या व्यक्तीच्या सांगण्यावर आणि सल्ल्यावर अवलंबून राहू लागते, ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य त्या भोंदूच्या ताब्यात जाते. ही मानसिक गुलामगिरी अखेर आर्थिक, भावनिक आणि प्रसंगी शारीरिक शोषणाच्या भीषण वळणावर येऊन थांबते.

भोंदूगिरीला खतपाणी घालणारे मुख्य घटक

समाजात स्त्रियांवर अनेक अदृश्य बंधने असतात. घर, सासर-माहेरचे तणाव, नातेसंबंधांमधील कटुता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली महिलांचे मन सतत दबलेले असते. अशा प्रदीर्घ मानसिक कोंडीत जेव्हा एखादा ‘दैवी’ किंवा ‘तारणहार’ वाटणारा माणूस भेटतो, तेव्हा त्या महिलेला तिथं मानसिक मुक्तीचा आभास होतो. मानसोपाचारतज्ज्ञांच्या मते, ‘मनात दाबून ठेवलेली इच्छा अचानक व्यक्त होण्याची संधी मिळाली की, स्त्री सहजपणे समर्पण करते. कौटुंबिक दबावामुळे आलेल्या अगतिकतेतून ती बाहेरच्या व्यक्तीला चक्क ‘देवासारखे’ मानू लागते. या प्रक्रियेतून तिच्या मनाला तात्पुरते सुख आणि आधार मिळत असला, तरी हा सुखद भ्रम अखेर तिच्या खऱ्या आयुष्याला उद्ध्वस्त करण्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतो.

जनजागृती हाच शोषणाविरुद्धचा प्रभावी उपाय

दैवी शक्तीच्या नावाने होणारे स्त्रियांचे मानसिक आणि शारीरिक शोषण रोखण्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज झाली आहे. स्त्रियांनी वाचनाची आवड जोपासावी, अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे आणि मानसिक अस्वस्थता जाणवल्यास ‘बाबां’कडे जाण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घेण्यास संकोच करू नये. खरी शक्ती ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीत किंवा ‘गुरु’मध्ये नसून ती तुमच्या स्वतःच्या विचारात आहे, हे ओळखून स्त्रियांनी कोणावरही आंधळेपणाने अवलंबून राहणे थांबवले पाहिजे. विवेकबुद्धीचा वापर आणि ज्ञानाचा प्रकाश हाच भोंदूगिरीच्या अंधाराला नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे हे मात्र नककी.

Exit mobile version