अशोक खरात विरोधात १७ गुन्हे; लवकरच सर्व प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होणार
SIT कडे तपासास असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे आहेत. तसेच फसवणूकीचा १ गुन्हा आहे.
अशोक खरात याचे विरूद्ध (Kharat) नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे. ३ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करीत आहे. तसेच ३ गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलीस करीत आहेत. २ गुन्ह्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करीत आहेत. अशोक खरातवरील कारवाई बाबत पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास SIT चे मार्फतीने करणेबाबत आदेश केल्यामुळे २० मार्च पासून या व इतर १०, अशा एकूण ११ गुन्ह्यांचा तपास SIT करीत आहे. या विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून २ पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून ३ पोलीस निरीक्षक, ३ सहा. पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक व ६ पोलीस अंमलदार असे एकूण २४ पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
पूजा-विधी, फोटो, व्हिडिओ आणि आर्थिक व्यवहार; अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची कसून चौकशी
SIT कडे तपासास असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे आहेत. तसेच फसवणूकीचा १ गुन्हा आहे. तसेच अशोक खरात याने साक्षीदारांविरूद्ध खोटा खंडणीचा १ गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याने फिर्यादीवर दबाव टाकून साक्षीदाराविरूद्ध १ गुन्हा दाखल केला होता, असे २ गुन्हे आहेत. उर्वरित ८ गुन्ह्यांचा तपास संबंधीत घटक करत आहेत. अशोक खरात विरूद्ध दाखल असलेल्या एकूण गुन्हयांपैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. तसेच उर्वरित ९ गुन्हे हे फसवणूक सह अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ व इतर या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व ८ गुन्हे व फसवणुकीचा १ गुन्हा SIT तपास करीत आहे. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे व पीडितांकडे केलेल्या चौकशीतून आरोपी हा पीडित व्यक्ती व कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, भीती दाखवून, खडे, चिंचुके, रूद्राक्ष, पुजा, विधी आदी माध्यमातून त्यांचेकडून पैसे उकळत होता, तसेच महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये, हात चलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत होता, याबाबत आरोपी विरोधात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य, इलेक्ट्रॉनिक पुरावा असे पुरावे प्राप्त झाले आहेत. त्या अनुशंगाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे.
महिलांशी संबंधीत गुन्ह्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून ६० दिवसांच्या आत दोषोरापपत्र दाखल करणे आवश्यक असते. अशोक खरात विरोधात लैंगीक अत्याचाराचा पहिला गुन्हा १७ मार्च रोजी दाखल झाला. त्या नंतर आठवडा भरात इतर सात गुन्हे दाखल आहेत. आज रोजी एकुण लैंगिक अत्याचारांचे गुन्ह्यांपैकी अशोक खरात विरोधातील एकूण २ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरीत गुन्ह्यांचे देखील दोषारोपपत्र येत्या काही दिवसात न्यायालयात दाखल करण्यात येतील.
SIT कडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडीओच्या १३ हजार १७५ लिंक्स SIT च्या सायबर टीमने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने SIT ने काढून टाकल्या आहेत. तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणारे ४५१ अकाऊंट देखील कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहेत. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी आतापर्यंत २ गुन्हे दाखल केले गेले आहेत.
गुन्हयातील आरोपी अशोककुमार एकनाथ खरात हा एकूण ४९ दिवस वेगवेगळ्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाचे कस्टडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. सध्या तो इतर ठिकाणच्या गुन्ह्यात अटक आहे. आज पावेतो दाखल गुन्हयांचे तपासामध्ये प्राप्त झालेल्या साक्षी पुराव्यांवरून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असले तरीही वरील गुन्ह्यांचा तपास पुढे सुरूच राहणार असुन अधिकचे पुरावे प्राप्त होताच ते न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रासह दाखल करण्यात येतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.