Download App

‘माझी लाडकी बहिण निवडणुकीपुरती.. एक, दोन हप्तेच मिळणार’; शरद पवारांचं खोचक भाष्य

राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे निवडणुकी पुरतेच एक दोन हप्ते दिले जातील. त्यानंतर दिले जाणार का हा प्रश्न आहे.

Sharad Pawar Press Conference : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर (Elections 2024) आलेल्या असतानाच महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र सरकारच्या अर्थ खात्याने या योजनेला तीव्र विरोध केल्याचे समोर आले आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही (Sharad Pawar) या योजनेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे निवडणुकी पुरतेच एक दोन हप्ते दिले जातील. त्यानंतर दिले जाणार का? हा प्रश्न आहे. सरकारला या योजनेचा लाभ द्यायचाच होता तर आधीच का नाही  दिला? अशीही चर्चा लोकांमध्ये आहे, असे शरद पवार म्हणाले.

तुम्हाला तडीपार केलं होतं अन् तुम्ही.. शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर 

शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या वाटचालीबाबत भाष्य केले. सरकारच्या या योजना तात्पुरत्या आहेत.  एखाद दुसरा हप्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपावर चर्चा होईल. जागावाटपात तडजोडीसाठी जी समिती नियुक्त करण्यात येणार आहे त्यात शिवसेनकडून संजय राऊत यांनी तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी नावं दिली आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावं दिली आहेत. याबाबत 12 ताररेखनंतर बैठक होईल. काही झालं तरी एकवाक्यता ठेवायची, जागांबाबत निर्णय घ्यायचा आणि लोकांना पर्याय द्यायचा असं तिन्ही पक्षांचं ठरलं आहे, असे शरद पवार म्हणाले.

माजी आमदाराने सोडली अजितदादांची साथ; दुर्रानी आजच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

..तर त्याची किंमत मोजावी लागेल

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला संधी आहे. लोकसभेत आम्ही एकसंघ राहिलो. लोकांना पर्याय दिला. त्याच पद्धतीने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. याला आता मूर्त स्वरुप आले पाहिजे. असे जर घडले तर लोकसभेसारखीच स्थिती दिसून येईल. नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल परंतु, लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही. सर्व एकत्र आले तर ठीक अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिला.

follow us